पंकजा मुंडे, राम शिंदे यांना मंत्रिपद नाही? भाजपचा ‘तो’ अलिखित नियम येणार आड
महायुतीने विधानसभा निवडणुकीत ग्रँड विजय मिळवला आहे. भाजपने सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्वाधिक मंत्रिपदंही भाजपच्या वाट्याला येणार आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिपद देण्यात आले नव्हते. भाजपच्या वरिष्ठांनी विधानसभेला विजयी होणाऱ्या उमेदवारांना मंत्रिपद मिळणार असल्याचे त्यावेळीच स्पष्ट केले होते. त्यामुळे या वेळी देखील विधान परिषदेतील आमदारांना मंत्रिपद मिळणार नसल्याचा अलिखित नियम पंकजा मुंडे, राम शिंदे यांच्या मंत्रिपदाच्या आड येण्याची शक्यता आहे. राम शिंदे हे विधान परिषदेत आमदार आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ते रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाले.
पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. 2019 ला विधानसभेच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. यंदा लोकसभेच्या निवडणुकीत देखील त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. मात्र, भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेत त्यांचे पुनर्वसन केले. भाजपला मिळालेल्या यशामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
20-12-10 मंत्रिमंडळा फाॅर्म्युला
मंत्रिमंडळाच्या फाॅर्म्युला हा 20-12-10 असा राहणार असल्याची चर्चा आहे. सर्वाधिक 20 मंत्रीपदं भाजपकडे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 12 तर अजित पवार यांच्या पक्षाला 9 ते 10 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषदेमधील आमदरांना मंत्रिपदाची संधी मिळणार का? याची चर्चा आहे.
…तर परळीत दोन मंत्री?
पंकजा मुंडे यांनी परळीचे नेतृत्व केले आहे. 2019 ला त्यांना धनंजय मुंडे यांनी पराभूत केले. यंदा पंकजा मुंडे निवडणुकीच्या मैदानात नव्हत्या. परळीतून पुन्हा धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये असलेल्या पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळाले तर परळीला दोन मंत्री मिळतील.