जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
राज्यात महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने आल्याने विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर खापर फोडले आहे. लाडकी बहीण, बटेंगे तो कटेंगे असे इतरही मुद्दे आहेत. अशातच जवळपास ९५ मतदारसंघात झालेले एकूण मतदान आणि ईव्हीएमद्वारे मोजलेले मतदान यात तफावत आढळून येत असल्याने पुन्हा एकदा या ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
अशातच मविआचे इतर उमेदवार पडलेले असताना जितेंद्र आव्हाड कसे काय निवडून आले, तिथे ईव्हीएम घोटाळा झाला नाही का, असा सवाल विचारण्यात येत होता. यावर आव्हाड यांनी ते कसे निवडून आले, त्यांनी काय काय काळजी घेतली फेसबुकवर पोस्ट करून सांगितले आहे.
1 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्ह्यात ईव्हीएम मशिनची FLC प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आली होती. यावेळी माझी एक टीम 25 सहकाऱ्यांसोबत पहिल्या दिवसापासून सज्ज झाली. त्यांच्या सोबतीला वकिलांची एक टीम देखील कामाला लागली होती, असे आव्हाड म्हणाले.
माझ्या या टीमने यात पूर्ण गांभीर्याने लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली. ईव्हीएम मशीनबाबत पहिल्या टप्प्यातील तपासणी (FLC), रँडमायझेशन १-२ व नंतर कमिशनिंगची प्रक्रिया जी पार पाडली जाते त्यावर या टीमने लक्ष ठेवले. या लोकांनी निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असल्यास तो त्यांच्या लक्षात आणून दिला, चुका होत असल्यास त्यात माझी मदत घेऊन त्या दूर केल्या. अधिकाऱ्यांशी वाहीवेळा वादही झाला, गोड बोलुनही कामे करून घेण्यात आली. हे करण्यामागे आमचे सर्व गोष्टींवर लक्ष आहे याची जाणीव करून देण्याची रणनिती होती, असे आव्हाड म्हणाले.
ईव्हीएमच्या वाहतुकीवरही आम्ही लक्ष ठेवले होते. जेव्हा जेव्हा ही ईव्हीएम एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यात आली तेव्हा तेव्हा त्या गाड्यांमागे आमची टीम जात होती. एक गाडी बिना पोलीस सुरक्षा घेत निघाली होती, ती देखील आम्ही पकडली होती, त्याचे ट्विटही केले होते, असे आव्हाड यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या सर्व प्रक्रिया आम्ही पार पाडल्या. त्यामुळे कोणत्या बुथवर कोणती मशीन जाणार याचे तपशील आमच्याकडे होते. यामुळे इतर कोणाच्या मशीन तिथे नेण्याची हिंमत होऊ शकली नाही. मतमोजणी वेळी देखील आमच्या एजंटना याची माहिती दिली गेली. त्यांचे प्रशिक्षण घेतले. यामुळे कोणताही धांदली माझ्या मतदारसंघात होऊ शकली नाही आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.