अब्दुल सत्तारांची उमेदवारी रद्द ? निवडणूक आयोगाने दिले आदेश
उमेदवारी रद्द होण्याची टांगती तलवार डोक्यावर असलेले मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने थेट सत्तार यांच्या शपथपत्राची तातडीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जाच्या शपथपत्रात मालमत्तेची लपवाछपवी केली आहे. प्रत्यक्षातील मालमत्ता आणि शपथपत्रात दाखवण्यात आलेली मालमत्ता याच्यात तफावत असल्याची तक्रारी करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा निवडणूक आयोगाने अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीत सत्तार दोषी आढळल्यास त्यांची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रात 16 चुकी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी केला होता. त्याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. सत्तार यांनी आपल्या मालमत्तेत दागिने, वाहने, मालमत्ता याच्यासह विविध सहकारी संस्थांमधील शेअर्सची माहितीही चुकीची आणि अर्धवट दिली आहे, असं तक्रारीत म्हणण्यात आलं आहे. त्यावर जिल्हा निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत. तर उमेदवारी अर्ज वैध ठरवण्याच्या आधीच हा अहवाल येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी रद्द केली जाणार का ? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.