ना पिन ना कार्ड! ATM मशीनमधून असे काढायचा पैसे; बाप-लेकाची शक्कल
पैशांसाठी लोक गुन्हेगारी कृत्यं करतात. उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक घटना घडली आहे. घोटाळा करून एटीएममधून पैसे काढणाऱ्या बाप-लेकाला पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याकडून रोख साडेतीन हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. एक तरुण एटीएममधून पैसे काढत होता. त्याचे पैसे अडकले आणि त्याने या दोघांना ते पैसे काढताना पाहिलं. त्यानंतर या दोघांच्या कृत्याचा पर्दाफाश झाला. महमूदाबाद कोतवाली भागातली ही घटना आहे. दोन्ही आरोपी काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आले होते. त्यांच्यावर आधीही काही गुन्हे दाखल आहेत.
महमूदाबाद-लखनौ रस्त्यावर रेल्वे स्टेशनजवळ एक फौजी रेस्टॉरंट आहे. तिथे एक एटीएम आहे. याच भागात राहणारा रियाज पैसे काढायला एटीएममध्ये गेला. कार्ड टाकून त्याने पाच हजार रुपये रक्कम एंटर केली. व्यवहार यशस्वी झाल्याचं त्याला स्क्रीनवर दिसत होतं. तसंच खात्यातून पैसे कापले गेल्याचा मेसेजही आला; मात्र पैसे मशीनमधून बाहेर आले नाहीत. रियाज काही वेळ तिथेच थांबला. मग एटीएमच्या बाहेर आला.
पैसे निघाले नसल्याने रियाजने एटीएमच्या हेल्पलाइन नंबरवर फोन केला. याचदरम्यान, बाहेर उभे असलेले उमाकांत मिश्रा आणि त्यांचा मुलगा उदय मिश्रा हे दोघे जण एटीएममध्ये गेले. जिथून पैसे निघतात तिथून ती पट्टी काढून ते पैसे काढू लागले. रियाजने ते पाहिलं आणि त्यांना विरोध केला. त्यानंतर रियाजचा त्यांच्याशी वाद झाला. रियाजने आरडाओरडा केल्याने परिसरातले नागरिक तिथे जमले. नंतर त्यांनी पोलिसांना याबद्दल कळवलं. कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या बाप-लेकाला अटक केली.
सीओ दिनेश शुक्ला यांनी सांगितलं, की रियाजच्या तक्रारीनंतर लखनौमधल्या गुडंबा मिश्रपूरचे रहिवासी उमाकांत आणि उदय मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांची तुरुंगात रवानगी केली जाईल.
शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एटीएममधून पैसे चोरणाऱ्या दोघांना महमूदाबाद परिसरातून अटक केली आहे. सुरुवातीला हाती आलेल्या माहितीनुसार दोघांवर लखनौमध्ये आधीच गुन्हा दाखल आहे. दोघे जण एटीएममध्ये जायचे आणि पैसे जिथून निघतात तिथे आडवी पट्टी लावायचे. पैसे काढणाऱ्याला वाटायचं की पैसे अडकले आहेत. तो मनुष्य तिथून निघून गेल्यावर दोघे आरोपी ती पट्टी काढून पैसे घ्यायचे आणि तिथून निघून जायचे.’
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. एटीएममधून 3500 रुपये काढले आणि त्याआधी 1800 रुपये काढले होते. केलेल्या कृत्याचा या दोघांना पश्चाताप नव्हता. दोघे एटीएममध्ये छेडछाड करून पैसे गोळा करायचे आणि ऐशोआरामात जगायचे. प्रत्येक ठिकाणी ते रोखीनेच व्यवहार करायचे.