‘माझ्यावर अत्याचार झाला’; महिलेची तक्रार, नराधमाची पत्नी म्हणाली ‘तू तर लकी’
वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून हेल्पलाइन क्रमांक सुरू केले जातात. लोकांना घरबसल्या मदत मिळावी हा त्यामागचा उद्देश असतो. या हेल्पलाइन क्रमांकावर लोक कधी हवामानाचा अंदाज विचारतात, तर कधी वाहतुकीची स्थिती जाणून घेतात.
हेल्पलाइन सेंटरवर वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी ऐकायला मिळतात. तमिळनाडूतल्या शिक्षण विभागाने विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला. सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या 14417 या क्रमांकाच्या 24/7 हेल्पलाइन सेंटरवर विद्यार्थी अनेक समस्या, प्रश्न मांडत असतात. काही जण हवामानाची माहिती घेतात, तर काही मुली त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटना सांगतात.
शिक्षण विभागाच्या या हेल्पलाइन क्रमांकावर एकदा एका गंभीर प्रकरणाबाबत फोन आला. या फोनवर एका मुलीने तिच्या बाबतीत घडलेली घृणास्पद घटना सांगताच समुपदेशिकेलादेखील धक्का बसला. कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट सलमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मला एका मुलीचा फोन आला. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचं तिने सांगितलं. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. हेल्पलाइन क्रमांकावर अशा प्रकारची समस्या ऐकायला मिळेल यावर विश्वास बसत नव्हता. बदनामीच्या भीतीने तिचे कुटुंबीय प्रकरण दाबून टाकण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे या मुलीने हेल्पलाइनवर कॉल केला.’
सलमा यांनी पुढे सांगितलं, की ‘तमिळनाडूतल्या एका छोट्या गावातल्या विद्यार्थिनीने फोन करून मला सांगितलं, की शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला आहे. तिने आई-वडिलांना याबाबत सांगितलं. त्यानंतर तिचे आई-वडील मला घेऊन शेजारच्या व्यक्तीकडे गेले असता, आरोपीची पत्नी त्यांच्याशी वाद घालू लागली.’ अत्याचार झाल्याने या मुलीने स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे,’ असं आरोपीची पत्नी म्हणाली. तक्रार केल्यास बदनामी होईल म्हणून तिचे कुटुंबीय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही मुलगी हेल्पलाइन क्रमांकाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली.’
पीडित मुलीने नुंगमबक्कम इथल्या कॉल सेंटरवर फोन केला होता. या कॉल सेंटरवर रोज किमान 500 ते 600 आणि दर महिन्याला 5000 पेक्षा जास्त कॉल येतात. सरकारने एखाद्या योजनेची घोषणा केली तर कॉलची संख्या आणखी वाढते. या सेंटरने आतापर्यंत तमिळनाडूतल्या एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत केली आहे. या हेल्पलाइन सेंटरवर सर्व प्रकारच्या कॉल्सना सामोरं जाण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या ठिकाणी मुलं मारहाणीपासून ते लैंगिक शोषणापर्यंत कोणतीही समस्या शेअर करू शकतात.