इस्रायल-इराणमधील तणाव आणखी वाढला, 3 देशांनी एअर स्पेस केली बंदआणखी वाढला, 3 देशांना एअर स्पेस केली बंद
इस्त्रायली डिफेन्स फोर्सेसने (IDF) शनिवारी इराणमधील अनेक लष्करी ठिकाणांवर लक्ष्य केले. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण, सीरिया आणि इराकने आपली हवाई क्षेत्रे पूर्णपणे बंद केली आहेत. ओपन सोर्स फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट FlightRadar24 नुसार, या तीन देशांवर कोणतेही विमान उड्डाण करत नाहीय.
मात्र, इराणने आता या हल्ल्यांनंतर पुन्हा उड्डाणे सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे.
आयडीएफच्या माहितीनुसार, इस्त्रायली हवाई दलाच्या (IAF) सहकार्याने शनिवारी सकाळी तीन टप्प्यांत हे हल्ले करण्यात आले. 1 ऑक्टोबर रोजी तेहरानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी ही कारवाई होती. इस्रायली संरक्षण दलाने सांगितले की, “आयडीएफने आपले लक्ष्य पूर्ण केले आहे. जर इराणच्या राजवटीने पुन्हा तणाव वाढवण्याची चूक केली, तर आम्ही प्रत्युत्तर देऊ.”
IDF ने म्हटले आहे, “जे इस्रायलला धमकावत आहेत आणि प्रदेशात तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतात त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आजच्या कृतींमुळे इस्त्रायल आणि तेथील नागरिकांचे संरक्षण करण्याची आमची क्षमता आणि वचनबद्धता दिसून येते.”
आयडीएफने सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे हवाई दलाने इराणमधील स्थळांना लक्ष्य केले, जेथे गेल्या वर्षी इस्रायलवर डागलेली क्षेपणास्त्रे तयार केली गेली होती. याशिवाय, या मोहिमेत इराणच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनाही लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन मध्य पूर्व दौऱ्यावरून परतल्यानंतर हा हल्ला झाला. त्यांनी इस्रायली अधिकाऱ्यांना संघर्ष वाढवू नये असे आवाहन केले आहे.