बलात्काऱ्याला दहा दिवसांत होणार फाशी, पश्चिम बंगाल विधानसभेत अपराजिता विधेयक मंजूर
आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या बलात्कार प्रकरणानंतर पश्चिम बंगाल सरकारने महिला तसेच लहान मुलांवर होणाऱया अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नवीन विधेयक आणले आहे. बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपीला दहा दिवसांत फाशी देण्याची तरतूद या विधेयकात आहे.
ममता बॅनर्जी यांच्या सरकारने मांडलेले हे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.
कोलकात्यातील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बलात्काराच्या विरोधात कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा करण्याची मागणी केली. त्यानंतर आज पश्चिम बंगाल विधानसभेत ममता सरकारने ‘अपराजिता वुमन, चाईल्ड बिल’ हे नवे विधेयक मांडले. हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. महिला आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आणलेल्या या विधेयकावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
विधेयकातील तरतुदी
– बलात्कार, सामूहिक बलात्काराच्या आरोपींना आजन्म जन्मठेप.
– बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपीला फाशी.
– बलात्कार प्रकरणाचा तपास 21 दिवसांत करणे बंधनकारक
– बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालणार.