पावसाळ्यात हिरे वाहून आणते ही नदी; आतापर्यंत अनेक जण झालेत कोट्यधीश
मध्य प्रदेश : जर तुमच्या नशिबात पैसा असेल, श्रीमंती असेल तर तुम्ही करोडपती व्हायचं स्वप्न पाहात असाल तर मध्य प्रदेशातल्या एका नदीत तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. नदीत वाहून येणारे छोटे-मोठे दगड, रेती चाळून रातोरात नशीब बदलू शकतं.
हे खरोखर घडलंय, कारण या नदीत म्हणे हिरे सापडतात. पावसाळ्यात नदीचा प्रवाह वेगवान होतो, नदीला पूर येतो तेव्हा पाण्याबरोबर हिरेही वाहून येतात असं इथे सांगितलं जातं. कुठे आहे ही नदी आणि काय आहे या हिऱ्यांचं रहस्य?
ही नदी मध्य प्रदेशात बुंदेलखंडच्या पन्ना जिल्ह्यात आहे. अजयगड तालुक्यात उगम पावणाऱ्या या नदीचं नाव रुंझ. पावसाळ्यात ही नदी पुराबरोबर हिरेही घेऊन येते, असं म्हटलं जातं. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीकाठी अनेक लोक खडी आणि दगड-रेतीमध्ये हिरे शोधताना दिसतात.
या नदीतून 2 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला 72 कॅरेटचा हिरा सापडला होता. ही बातमी पसरताच हजारो लोक हिऱ्याचा शोध घेण्यासाठी पोहोचले होते, मात्र हा परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने सर्वांना तेथून हटवून नदीकिनारी येण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतरही लोक गुपचूप नदीकाठी पोहोचतात. असे हिरे शोधून लोक आपलं नशीब आजमावतात.
हा हिरा जितका मौल्यवान आहे, तितकाच तो मिळवणं महाकठीण आहे. नदीकाठी लोक फावडे, संबळ, तसला आणि जाळीच्या टोपल्या घेऊन हिऱ्यांच्या शोधात येतात. आजही रुंझ नदीच्या काठी काही नादिष्ट लोक हिऱ्याचा शोध घेताना दिसतील. नदीच्या खालच्या भागाव्यतिरिक्त दोन्ही किनाऱ्यांवर त्यांचा शोध सुरू असतो. नदीतून आणली रेती टोपलीत घालून बाहेर काढतात आणि त्यातून हिरा शोधतात. याशिवाय प्रवाह जास्त असलेल्या भागात जाळीच्या टोपल्यांच्या साहाय्याने शोध घेतला जातो. नदीकाठचे दगड खोदूनही हिरे शोधतात. प्रत्येकजण आपापल्या परीने मेहनत घेतो, पण जो सर्वात नशीबवान आहे त्याला खजिना मिळतो.
काही दिवसातच संपेल शोध
या नदीवर रुंझ धरण बांधण्यात येत असून, त्याचं काम वेगाने सुरू आहे. सुमारे 60 टक्के काम पूर्ण झालं आहे. लवकरच धरणाचं बांधकाम पूर्ण होईल हा नदीचा परिसर बॅकवॉटर म्हणून पाण्यात जाईल. धरण बांधल्यानंतर नदीचा हा परिसर शेकडो फूट खोल पाण्यात बुडणार आहे. मग लोकांचं इथे येणंही बंद होईल आणि हिऱ्याचा शोधही थांबेल.
काय आहे इतिहास?
बुंदेलखंडमधील पन्नाला सुमारे 300 वर्षं जुना हिऱ्याचा इतिहास आहे. या भागात हिऱ्याच्या खाणी पूर्वीपासून सापडतात. महाराज छत्रसाल यांच्या काळापासून स्वामी प्राणनाथांच्या आशीर्वादाने इथे हिरे उत्खननाची सुरुवात झाली, असं मानलं जातं. इथे आजही हिऱ्यांची खाण आहे. आसपासच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेऊन लोक खोदकाम सुरू करतात आणि आपलं नशीब आजमावतात. एखादा हिरा हाताला लागला तरी नशीब पालटतं. इथे अनेक जण रातोरात कोट्यधीश झाले असल्याच्या गप्पा ऐकू येतात.