ताज्या बातम्या

तीन तासांत चार वेळा भूस्खलन, 93 जणांचा मृत्यू, 400 बेपत्ता,वायनाडवर आभाळ कोसळले. चार गावे वाहून गेली!


वायनाडवर मंगळवारी पहाटे अक्षरश: आभाळ कोसळले. मुसळधार पावसाचा तडाखा झेलणार्‍या वायनाडमध्ये तीन तासांत चार भूस्खलनाच्या घटना घडल्या असून मातीच्या महापुरात चार गावे वाहून गेली.



या गावांचे नामोनिशाणच शिल्लक राहिले नाही. घर, पूल, रस्ते, वाहने… काहीच वाचले नाही. सगळे काही वाहून गेले. भूस्खलनात 93 जणांचा मृत्यू झाला असून 400 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफसोबतच मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

आतापर्यंत शेकडो जणांना ढिगार्‍याखालून वाचवण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही ढिगार्‍याखालून ‘वाचवा… वाचवा..’ अशा मदतीसाठी फोडलेल्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

केरळातील वायनाडमध्ये पावसाने संततधार लावली आहे. तीन दिवसांपासून पाऊस बेभान कोसळत असल्याने नदी, नाल्यांनी अनेक ठिकाणी पात्र सोडले आहे. मुण्डक्कई, चूरलमला, अट्टमला आणि नूलपुझग या दुर्गम भागाचा अगोदरच अतिवृष्टीमुळे संपर्क तुटला होता. त्यात मध्यरात्रीच्या वेळी तीन तासांत चार ठिकाणी महाप्रचंड भूस्खलन झाले. मातीच्या महापुराने क्षणार्धात झोपेच्या अधीन असलेली चार चिमुकली गावे आपल्या उदरात गडप केली. घरे, रस्ते, पूल, वाहने कशाचेही नामोनिशाण शिल्लक राहिले नाही. मातीचा महापूर आपल्यासोबत ही गावेही घेऊन गेला. ध्यानीमनी नसताना आलेल्या या अस्मानी संकटापुढे माणूस हतबल ठरला. निमिषार्धात सगळीकडे दलदल माजली. भूस्खलनाने या परिसरात हाहाकार उडाला. भूस्खलनाची पहिली घटना पहाटे 2 वाजता घडली. त्यानंतर लागोपाठ भूस्खलनाच्या तीन घटना घडल्या.

तातडीने वायुदलाचे हेलिकॉप्टर रवाना
वायनाड परिसरातील भूस्खलनाची माहिती मिळताच या भागात मदतीसाठी तामिळनाडूतील सुलुर येथून वायुदलाची दोन हेलिकॉप्टर्स तातडीने रवाना करण्यात आली. परंतु मुसळधार पावसामुळे या हेलिकॉप्टरचा काहीही उपयोग झाला नाही. भूस्खलनामुळे वायनाडकडे जाणारे रस्ते खचले. त्यामुळे थामरसेरी महामार्गावरील वाहतूक केवळ मदत घेऊन जाणार्‍या वाहनांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केरळ आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव शेख कुरियाकोस यांनी सांगितले.

लष्कराचे पथक मदतीसाठी दाखल
भूस्खलनाच्या घटनेनंतर ढिगार्‍याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला गावकर्‍यांनीच प्रयत्न केले. त्यांच्या मदतीला राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे पथक आले. त्यापाठोपाठ एनडीआरएफची पथकेही आली. परंतु हे मदतकार्यही तोकडे पडत असल्यामुळे लगेच लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कराचे पथक दाखल होताच मदतकार्याला वेग आला. जागोजाग ढिगार्‍याखालून ‘वाचवा… वाचवा..’ अशा किंकाळ्या ऐकू येत असल्याने लष्करी जवानही भांबावून गेले होते.

मुंडक्काई गावच बेपत्ता!
रात्रीच्या अंधारात डोंगरातून अचानक मातीचा महाकाय ढिगारा आला आणि मुंडक्काई गावच त्यात बेपत्ता झाले. गावाकडे जाणारे सर्व रस्ते दलदलीने भरून गेले. सगळीकडे पुरुषभर उंचीचा चिखल झाला. मदतीसाठी लष्कराचे पथक आले… पण त्यांना गावच दिसत नव्हते. काही लोक मदतीसाठी याचना करत होते. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीही जवानांना महत्प्रयास करावा लागला. सायंकाळपर्यंत या ठिकाणी मदतही पोहचू शकली नाही.

मुख्यमंत्र्यांची देखरेख, दोन दिवसांचा शोक
वायनाड भूस्खलनाची माहिती मिळताच मुख्यमंत्री पी. विजयन यांनी आपत्ती निवारण कक्षात धाव घेतली. पाच मंत्र्यांना तात्काळ मदतकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी वायनाडकडे रवाना करण्यात आले. प्रशासनातील अनुभवी अधिकार्‍यांना हाताशी धरून अगोदर नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्याचे काम सुरू करण्यात आले. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी वायुदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. त्याचबरोबर राज्यात दोन दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला.

चालियार नदी कोपली… अनेकजण वाहून गेले
मुसळधार पावसामुळे वायनाडमधील सर्व नद्या, नाले पात्र सोडून वाहत आहेत. मलप्पुरम येथील नीलांबूर भागातून वाहणारी चालियार नदी तीन दिवसांपासून धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यातच मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने चालियार नदीने रौद्रभीषण रूप धारण केले. नदीच्या महापुरात अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत असून आतापर्यंत 15 मृतदेह सापडले आहेत.

लष्करी जवान दोरीच्या मदतीने पोहोचले
भूस्खलन झालेल्या ठिकाणी सर्वत्र दलदल झाली असून मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडचण आली. लष्कराचे पथक चूरलमला येथे पोहोचले. परंतु नदीला महापूर आल्यामुळे जवानांना दोरीचा पूल करून पैलतीरी मदतीसाठी जावे लागले. आतापर्यंत 70 मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले असून 84 जणांच्या मृत्यूची अधिकृत माहिती असल्याचे राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. वेणू यांनी सांगितले. शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आणखी दोन दिवस पावसाचा ‘रेड अलर्ट’ असल्यामुळे हेलिकॉप्टरची फारशी मदत होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख
वायनाड भूस्खलनाच्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. अशा कठीण प्रसंगी केंद्र सरकार केरळ सरकारच्या पाठीशी असून मृतांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button