Crime News : गर्भपात करताना मृत्यू झालेल्या विवाहित प्रेयसीचा मृतदेह नदीत टाकला; तिच्या दोन मुलांनाही नदीत फेकले !
Crime News : पिंपरी-चिंचवड – इंद्रायणी नदी म्हटले की मनात भक्तीभाव निर्माण होतो. मात्र, इंदोरी येथे या नदीच्या पात्रात घडलेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. गर्भपात करताना मृत्यू झालेल्या विवाहित प्रेयसीचा मृतदेह येथील नदीपात्रात टाकताना तिची दोन चिमुरडी मुले रडू लागली म्हणून त्यांनाही आरोपीने नदीत फेकून दिल्याचा अमानूष प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय ३७, रा. वराळे, ता. मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (वय ४१, रा. सावेडी, ता. जि. अहमदनगर) या आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे.
तिन्ही मृतदेह सापडेना…
दोन्ही आरोपींनी समरिन हिचा मृतदेह आणि तिच्या दोन मुलांना जिवंतपणे ९ जुलैला इंदोरी येथे इंद्रायणी नदीत फेकून दिले. त्यानंतर २१ तारखेला हा प्रकार उघड झाला. गेल्या १५ दिवसांपासून मावळ परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या तिघांचे मृतदेह शोधण्यात पोलिसांना अडसर येत आहे. पोलीस उपायुक्त बाप्पू बांगर आणि अन्य अधिकारी सोमवारपासून (दि. २२)तिघांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर समरिन निसार नेवरेकर (वय २५), ईशांत निसार नेवरेकर (वय ५), इजान निसार नेवरेकर (वय २, रा. वराळे, ता. मावळ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. गर्भपात करण्यासाठी मदत करणारी महिला एजंट बुधवंत (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), अमर हॉस्पिटल कळंबोलीमधील संबंधित डॉक्टर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाला. त्यामुळे तिचा मृतदेह प्रियकराने मित्राच्या मदतीने नदीत टाकून दिला. तेव्हा तिची दोन लहान मुले रडू लागल्याने प्रियकराने तिच्या दोन्ही लहान मुलांना देखील जिवंतपणे इंद्रायणी नदीत फेकून दिले. अत्यंत धक्कादायक आणि अंगार शहारे आणणारी घटना मावळातील तळेगाव दाभाडेजवळ असलेल्या इंदोरी येथे रविवारी (दि. २१) सायंकाळी उशिरा उघडकीस आली.
पोलीस उपायुक्त बाप्पू बांगर यांनी याबाबत माहिती दिली. वाहनचालक असलेला गजेंद्र आणि समरिन यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून समरिन ही गर्भवती राहिली. त्यामुळे तिचा गर्भपात करण्यासाठी गजेंद्र याने ”वैद्यकीय कर्मचारी असलेल्या रविकांत गायकवाड याच्यासोबत ठाणे येथे जाऊन गर्भपात कर,” असे समरिन हिला सांगितले होते. ६ जुलै रोजी समरिन ही रविकांत यांच्यासह घरातून निघून गेली. त्यानंतर कळंबोली येथील बुधवंत नामक एजंट महिलेमार्फत गर्भपात करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली.
त्या ठिकाणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तिथल्या डॉक्टरांनी नजीकच्या पोलिसांना माहिती देणे आवश्यक होते. मात्र डॉक्टरांनी तसे केले नाही. या उलट डॉक्टरांनी समरिन हिचा मृतदेह आरोपी रविकांत आणि एजंट महिला बुधवंत यांच्या ताब्यात दिला. आरोपींनी समरिन हिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह इंदोरी येथे इंद्रायणी नदीच्या पुलावर आणला.
त्यानंतर आरोपींनी समरिनचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. दरम्यान, हा प्रकार पाहून तिची दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. आपले बिंग फुटेल म्हणून आरोपींनी पुढचामागचा कोणताही विचार न करता दोन्ही मुलांनादेखील जिवंतपणे नदीमध्ये फेकून दिले.
दरम्यान, समरिन आणि तिची दोन्ही मुले बेपत्ता असल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप रायन्नवार, फौजदार विलास गोसावी, पोलीस कर्मचारी अमोल भडकवाड यांनी बेपत्ता समरिन आणि मुलांचा शोध सुरू केला होता. तेव्हा ती प्रियकर गजेंद्र याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. तसेच गजेंद्र हा रविकांत याच्या संपर्कात आणि रविकांत हा बुधवंत नामक महिलेच्या संपर्कात असल्याचे तांत्रिक विश्लेषणातून उघड झाले. या तिघांचा मागील १५ ते १८ दिवसात सातत्याने संपर्क होत असल्याने तसेच गजेंद्र-समरिन यांचे प्रेमसंबंध उघड झाल्याने पोलिसांनी गजेंद्र याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. समरिन हिचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह ९ जुलैला नदीपात्रात टाकून दिल्याचे त्याने सोमवारी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तो तपासासाठी तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गजेंद्र आणि रविकांत या दोघांना वडगाव मावळ न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक शाम मस्के या प्रकरणाचा तपास करीत आहेत.