भले भले क्रूरकर्मा आरोपीही भितीने गर्भगळीत होतील ! आधी बेशुद्ध करायचा, मग थेट जमिनीत पुरायचा
गुन्हेगार एखादं गुन्हेगारी कृत्य का करतो याचा अंदाज आपण लावू शकत नाही. अनेकदा आरोपी एवढ्या शांतपणे एखादा गुन्हा करतात की त्यांच्या मानसिकतेबाबत आश्चर्य वाटतं. 2012 मध्ये एका आरोपीने सात जणांचा जीव घेतला.
त्याने या सात जणांना कसं मारलं हे कळलं तर भले भले क्रूरकर्मा आरोपीही भितीने गर्भगळीत होतील.
अरुण चंद्राकर असं या आरोपीचं नाव आहे. त्याला सायको किलर म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. याचं कारणही तसंच आहे. ज्या ज्या व्यक्तीचा त्याला राग येईल त्याला आधी बेशुद्ध करायचं आणि नंतर जमिनीत एक खड्डा खोदून त्यात त्या व्यक्तीला जिवंत पुरायचं ही त्याची गुन्हा करायची पद्धत होती. 2012 मध्ये रायपूर पोलीस एका लहान मुलीच्या हत्येचा तपास करत होते. तेव्हा ते अरुण चंद्राकरपर्यंत पोहोचले आणि त्याच्या कृत्यांचा उलगडा झाला. त्यानंतर छत्तीसगडचा सायको किलर म्हणून पोलिसांकडे त्याची नोंद झाली. निठारी हत्याकांडातून त्याने या हत्या करण्याची प्रेरणा घेतल्याचं पोलिसांना सांगितलं.
अरुण चंद्राकरने केलेल्या हत्या हा एक अजब प्रकार आहे. जवळच्या व्यक्तींबाबत संशय किंवा संताप या दोन कारणांमुळे त्याने या हत्या केल्या आहेत. तो रायपूरमधील कुकुरबेडा परिसरातील रहिवासी होता. लहानपणापासून तो चोऱ्यामाऱ्या करत असे. त्यामुळे अनेकदा त्याला शिक्षाही होत असे. वडिलांनी त्याला घराबाहेर काढलं होतं. त्यामुळे तो दुर्ग रेल्वे स्टेशनवर राहात होता. वडिलांनी घराबाहेर काढल्यामुळे त्यांच्यावर असलेला त्याच्या मनातील राग हळूहळू वाढत होता. त्यातच त्याची मानसिक स्थितीही बिघडली होती.
तो सतत फक्त वडिलांचा जीव कसा घेता येईल, याचाच विचार करत असे. पोलिसांच्या हाताला न लागता हे कृत्य कसं करता येईल असा विचार तो करत असे. अशातच वडिलांना परगावी नेण्याचं निमित्त चालून आलं. तेव्हा अरुणने चालत्या ट्रेनमधून वडिलांना ढकलून दिलं. वडिलांचा मृत्यू झाला. ही त्याने केलेली पहिली हत्या होती मात्र तो अपघात असल्याचं भासवण्यात त्याला यश आलं. यानंतर रायपूरमधील बहादुर सिंह नामक व्यक्तीबरोबर किरकोळ वाद झाल्याच्या कारणावरुन अरुणने त्याला जमिनीत पुरलं. तिथून पळून तो आपल्या मूळ गावी आला.
लिली देवार नामक तरुणीशी त्याने प्रेम विवाह केला आणि तिच्या मामाच्या घरी ती दोघं राहू लागले. मामाच्या संपत्तीवर डोळा ठेवून अरुणने त्यालाही त्याच्याच घरात जमिनीत पुरुन त्याची हत्या केली. ही गोष्ट लिलीला समजल्यामुळे ती ही बाब उघड करेल या भीतीने त्याने त्याच पद्धतीने लिलीचा जीव घेतला. प्रत्येक खून लपवण्यासाठी पुढचा खून हे सत्र सुरुच राहिलं. रायपूर जिल्हा न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावली मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढे 2018 मध्ये त्याच्या मुलीच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली.