किमान धार्मिक स्थळ परिसर स्वच्छता व पावित्र्य जपा – नवनाथ शिराळे पाटील
किमान धार्मिक स्थळ परिसर स्वच्छता व पावित्र्य जपा – नवनाथ शिराळे पाटील
स्वच्छता व पाणीपुरवठा याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे…!
बीड : बीड नगरपरिषदेत प्रशासकाच्या दुर्लक्षपणामुळे संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य असून, सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने जनसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषत: शहरातील बिंदुसरा नदी काठी असणारे सोमेश्वर मंदिर, कृष्ण मंदिर, मारुती मंदिर, खासबाग तुळजाई देवी मंदिर, पीर बाले दर्गा बालेपीर, मनशूर शहा दर्गा, शहंशावली दर्गा, कंकालेश्वर मंदिर, नीळकंठेश्वर मंदिर, सावता माळी चौक आदि परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. मृत जनावरे, कोंबड्यांचे पंखांची घाण शिवाय शहरातील कचरा नदी किनारी टाकल्याने मंदिर, मशिद परिसरात नागरिकांना दुर्गंधीशी सामना करावा लागतो.
धार्मिक स्थळ परिसरात स्वच्छता व पावित्र्य राखण्याचे काम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांनी करावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा नगर परिषद माजी सभापती नवनाथ शिराळे पाटील यांनी केले आहे.
तसेच मान्सून पूर्व बीड शहराची नाले साफ सफाई, कचऱ्याचे ढीग उचलून तातडीने साफ सफाई करणे आवश्यक आहे. शहरात तीव्र पाणी टंचाई असून, अद्याप अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. गोरगरीब जनतेची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. यापूर्वी वारंवार मागणी करूनही मुख्य अधिकारी व प्रशासक यांनी गांभीर्याने दखल घेतलेली नाही. तरी आठ दिवसाच्या आत नाले सफाई, पाणी पुरवठा वेळेवर केला नाही तर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशार नवनाथ शिराळे यांनी दिला आहे.