महाभारतातील युद्धात भगवान रामाचा वंशज कौरवांकडून लढला, काय आहे कारण ?
रामायण आणि महाभारत हे हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथापैकी आहेत. याबद्दल हिंदू धर्मात प्रत्येकाला माहितीय. महाभारत हे कौरव आणि पांडव यांच्यामुळे घडलं होतं.
तर खूप कमी लोकांना माहितीय की ते एक अन्याय आणि न्यायाची लढाई होती. या युद्धात अनेक राजे, योद्धे सहभागी झाले होते. काही पांडवांचे समर्थ होते तर काही कौरवांच्या बाजूने होते. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर लढलेले हे युद्ध ऐतिहासिक होतं. महाभारत युद्धात श्रीकृष्ण कौरव किंवा पांडवा कोणाच्या बाजूने लढले नव्हते. पण श्रीकृष्णाने अप्रत्यक्षपणे पांडवांना मदत केली होती. कारण कौरवांनी पांडवांवर अन्याय केला असं श्रीकृष्ण मानत होते. त्यामुळे ते सत्याच्या बाजूने होते.
म्हणूनच महाभारत युद्धात श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी बनवून मार्गदर्शन करत होते. पण तुम्हाला माहित आहे का, की कुरुक्षेत्राच्या युद्धात एक योद्धा असा होता जो प्रभू रामाचा वंशज होता आणि त्याने युद्धात कौरवांना साथ दिली होती असं म्हणतात. कोण होता तो योद्धा जाणून घेऊयात.
महाभारत युद्धातील एक राजा होता बृहदबल तो अयोध्येचा राजा होता. हा राजा रामाचा वंशज होता असं म्हणतात. इक्ष्वाकु घराण्यातील विश्रुतवंताचा मुलगा म्हणून तो कोसल राज्याचा शेवटचा शासक मानला जातो. कुरुक्षेत्र युद्धात बृहदबल कौरवांकडून युद्ध लढला होता. भगवान रामाचे वंशज असूनही बृहदबलाने कौरवांचे समर्थन का केले हे याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटतं.
विष्णु पुराण आणि भागवत पुराणानुसार बृहदबल इक्ष्वाकू हे भगवान रामाचे पुत्र कुशचे वंशज असून बृहदबल हा राजा रामानंतरचा पंधरावा राजा होता. राम आणि बृहदबल यांच्यात 31-32 पिढ्यांचं अंतर होतं असं मानलं जातं. बृहदबल हा केवळ एक कुशल शासक नव्हता तर एक शूर योद्धा देखील मानला जातो.
हस्तिनापूरच्या गादीवरून कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध सुरू असं म्हटलं जातं. अशावेळी धृतराष्ट्राने आपल्या राज्यातून एक राजदूत कोसल राज्यात पाठवला. त्यावेळी राजा बृहदबलला कौरवांना मदत करण्याची मागणी केली. त्यावेळी त्या राजदूताने धृतराष्ट्राने सांगितल्याप्रमाणे बृहदबलला का युद्धात का मदत करावी याची आठवण करुन दिली. भीमामुळे बृहदबल राजाने आपलं राज्य गमावलं होतं आणि त्यामुळे इतर राज्यांमध्ये राजाची खिल्ली उडवली जात होती. यानंतर राजाला संपूर्ण घटना डोळ्यासमोर आली. राजसूर्य यज्ञात एके दिवशी भीमाने बृहदबलाला वश केलं. बृहदबल राजाच्या शत्रूसह त्याचा पराभव केला. या पराभवामुळे राजा बृहदबलचा खूप अपमान झाला आणि अनेक राजांनी गुप्तपणे त्याची थट्टा केली.
या घटनेमुळे राजा बृहदबलाच्या मनात भीमासह सर्व पांडवांबद्दल एक प्रकारचा राग होता. याचाच फायदा घेत धृतराष्ट्राने ही खेळी खेळली होती. धृतराष्ट्राच्या संदेशानंतर राजाने कौरवांच्या बाजूने युद्ध करण्याचा निर्णय घेतला. युद्धाच्या 13 व्या दिवशी अभिमन्यू चक्रव्यूहात प्रवेश करताच बृहदबल, द्रोण, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा आणि कृतवर्मा यांच्यासह अनेक कौरव योद्ध्यांशी लढले. या युद्धात अभिमन्यू आणि राजा बृहदबल यांच्यात युद्ध झालं, ज्यामध्ये अभिमन्यूच्या प्राणघातक बाणामुळे राजा बृहदबलचा मृत्यू झाला होता.