115 वर्षांपूर्वी गायब झालं होतं ‘शापित’ जहाज, अचानक आलं समोर
इतिहासात अशा अनेक जहाजांचा उल्लेख आहे, ज्या जहाजांना वाचवता आलं नाही आणि ती पाण्यात बुडून गेली आहेत. एक असं जहाजसुद्धा अस्तित्वात आहे की, जे बुडालं, पण त्याला शापित म्हटलं गेलं आहे.
साधारण 115 वर्षांपूर्वी हे जहाज बुडालं होतं आणि अचानक गायब झालं. त्यानंतर हे जहाज नेमकं कुठे गेलं ते कोणालाच समजू शकलं नाही. आता इतक्या वर्षांनंतर या जहाजाबद्दल काही आश्चर्यकारक छायाचित्रं प्रकाशात आली आहेत. अमेरिकेच्या जवळ हे जहाज गायब झालं होतं. प्रश्न असा आहे, की या जहाजाला शापित कशासाठी म्हटलं जातं?
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, सन 1894 मध्ये शोर्स लंबर कंपनीनं अमेरिकेच्या मिशिगनमध्ये जिब्राल्टर इथं एडेला शोर्स नावाचं एक जहाज तयार केलं होतं. या जहाजाचं नाव हे कंपनीच्या मालकाच्या मुलीच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. 735 टन वजन असलेली लाकडाची स्टीमशिप जेव्हा प्रवासासाठी निघाली तेव्हा त्यात 14 प्रवासी होते. 15 वर्षांच्या काळात 195 फूट लांबीचं हे जहाज आणखी 2 वेळा बुडालं होतं. त्या वेळी नावाड्यांनी सुद्धा हे जहाज शापित असल्याचं म्हटलं होतं.
1909 मध्ये झालं होतं हे जहाज गायब
29 एप्रिल 1909 रोजी मिनिसोटा इथं जाण्यासाठी हे जहाज निघालं होतं. तेव्हा त्या जहाजावर मिठाची पोती ठेवण्यात आली होती. पुढे दोनच दिवसांत म्हणजे, 1 मे 1909 रोजी हे जहाज कोणालाच दिसलं नाही. ते अचानक गायब झालं. हे जहाज मिशिगनच्या व्हाइटफिश पॉइंट इथून गायब झालं होतं. 2021 मध्ये म्हणजे तब्बल 115 वर्षांनी या जहाजाचा मलबा समुद्राच्या तळाशी 650 फूट खोलात सापडला. हे जहाज अगदी शेवटचं ज्या ठिकाणी पाहिलं गेलं होतं, त्या जागेपासून हे जवळपास 64 किलोमीटर लांब अंतरावर सापडलं. ग्रेट लेक्स शिपरॅक हिस्टोरिकल सोसायटीला या जहाजाचा मलबा मिळाला.
का म्हटलं जातं याला शापित जहाज?
ज्या काळात या जहाजाची निर्मिती झाली होती, त्या वेळी नवीन जहाजावर वाइनच्या बाटल्या फोडण्याची एक परंपरा अस्तित्वात होती. हे जहाज तयार करणाऱ्या कंपनीचे मालक आणि त्यांच्या कुटुंबातले सदस्य मद्यपान करत नसत. त्यामुळं त्यांनी मद्याच्या बाटल्यांऐवजी त्या जागी पाण्याच्या बाटल्या जहाजावर फोडल्या. एडेलाची बहीण बेसी हिनं या बाटल्या फोडल्या होत्या. ही परंपरा नीट पाळली न गेल्यानं हे जहाज शापित झालं आहे, असं तेव्हापासून मानलं जातं.