सलमान खान गोळीबार प्रकरणी गोळीबारासाठी बंदूक पुरविणाऱ्या दोघांना अटक
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबारप्रकरणी हल्लेखोरांना बंदूक पुरविणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या सदस्यासह दोघांना गुरुवारी अटक केली आहे.
रात्री उशिराने पथक दोघांना घेवून मुंबईत दाखल झाले. आरोपींनी एकूण ४० काडतुसे पुरवली होती. त्यापैकी १६ काडतुसांचा शोध गुन्हे शाखा घेत आहे.
सोनू सुभाष चंदर (३७) आणि अनुज थापन (३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. थापन हा बिश्नोई गॅंगचा सदस्य आहे. दोघेही मूळचे पंजाबचे रहिवासी असून सोनू एका किराणा दुकानात काम करतो तर थापन क्लिनर म्हणून काम करतो. दोघांनी १५ मार्च रोजी दोन बंदूक, चार मॅगझीन आणि ४० काडतुसे हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल या आरोपीना पुरवली. यापैकी बंदूक व्यवस्थित चालते कि नाही हे पाहण्यासाठी आरोपींनी दोन राउंड फायर करून बघितले. तसेच ५ राउंड सलमानच्या घरावर फायर केले होते. त्यापैकी १७ काडतुसे गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. उर्वरित १६ काडतुसांचे गूढ कायम असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
चंदर आणि थापन दोघेही मोबाईल फोन द्वारे हल्लेखोरांच्या संपर्कात होते. त्यांना फ्लाईटने मुंबईत आणण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या सांगण्यावरून सागर पाल आणि विकी गुप्ताने रविवारी पहाटे सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार घडवून आणला होता. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाच्या भादंवि कलम ३०७ यासह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंद आहे. गुन्हे शाखेने दोघांना अटक केल्यानंतर अनमोल बिश्नोईचा सहभाग समोर आला.गोळीबारानंतर अनमोल बिश्नोईच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवरुन गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली. पुढे हे ही पोस्ट डिलीट करण्यात आली. तर, लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून दिलेल्या एका मुलाखतीत सलमानवर हल्ला करण्याची जबाबदारी अनमोलला सोपविण्यात आल्याचे सांगितले होते. अखेर या गुन्ह्यात लॉरेन्स आणि अनमोल या दोघांना पाहिजे आरोपी म्हणून दाखवत मास्टरमाइंडचा शोध सुरु आहे.