शरद पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षामध्ये घडलेल्या घडामोडींबाबत सर्वात मोठे गौप्यस्फोट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दिग्गज नेते सत्तेत सहभागी झाले त्यांची सत्तेत सहभागी होण्यापूर्वी काय अवस्था होती, त्यांचं काय म्हणणं होतं, याबाबत शरद पवार यांनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत सर्वात मोठा खुलासा केला. “माझे काही सहकारी हे अस्वस्थ होते. त्यांना एजन्सीजचा त्रास होईल, असं वाटत होतं. ते आमच्याशी बोलत होते. त्यामुळे तिकडे जाणं म्हणजे वॉशिंगमशीन, कपडे टाकायचे आणि स्वच्छ करुन बाहेर निघतील, तशी संधी आपल्याला मिळेल, असं काही लोकांचं मत होतं”, असं शरद पवारांनी सांगितलं.
“ते गेले, ते अनेक वर्ष पक्षाचे काम करत होते. आम्ही त्यांना अनेक पदं दिली. हे सगळं असताना सुद्धा त्यांनी काही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केले होते. मी असं एकाचं नाव घेत नाही. पण काही लोकं होती. ते प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यानंतर मी मला शक्य नाही, मला योग्य वाटत नाही, असं म्हटल्याच्या नंतर आम्ही हा निर्णय घेतला. मी त्यांना सांगत होतो की, मी हे करणार नाही आणि तुम्हीदेखील हे करणं योग्य नाही”, असं शरद पवार म्हणाले.
‘त्यांचं आजचं मरण उद्यावर गेलं’
“मला अंदाज आहे की, जी फाईल टेबलवर जाईल ती मोदींच्या विचारांसोबत गेल्यानंतर ती फाईल कपाटात ठेवली जाईल. आता ती समजा नाही. उद्या त्यांना वाटेल तेव्हा ती फाईल कधीही काढली जाईल. त्यामुळे आजचं मरण उद्यावर गेलं, असं वाटलं तर त्यात काही चुकीचं नाही. त्यांच्या डोक्यावर कारवाईची तलवार नेहमी राहील, असं मला वाटतं”, असा मोठा दावा शरद पवारांनी केला. “सुप्रीम कोर्टात जावं लागेल. कोर्टाचा निकाल तर घ्यावा लागेल. राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणी महाराष्ट्राच्या एका एजन्सीने चौकशी केली. या चौकशीत त्यांनी काही लोकांचं काही नाही, असा निष्कर्ष काढला”, असं शरद पवार म्हणाले.
‘ते म्हणाले, आम्हाला पर्याय नाही’
“अजित पवार गट सत्तेत गेल्यानंतर काही नेते आपल्या भेटीसाठी आले. त्यांनी आपण हा निर्णय का घेतोय? याबाबत मला माहिती दिली. आम्ही का करतोय? आम्हाला पर्याय नाही. हे ते सांगत होते. तुम्ही आलात तर आम्हाला कुठलीच चिंता करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांनी तो निर्णय घेतला. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मला जे योग्य वाटत होतं त्या दृष्टीने मी आहे आणि राहणार आहे”, असं शरद पवार ‘टीव्ही 9 मराठी’ च्या विशेष मुलाखतीत म्हणाले.