नागपूर : आई-वडील कामावर गेल्यानंतर घरी एकट्या असलेल्या गतिमंद मुलीवर एका पुजाऱ्यासह चार नराधम सामूहिक अत्याचार करत होते.
ही संतापजनक घटना नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत समोर आली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोपींविरुद्ध तीव्र रोष आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली आहे.
राजेश गबडे उर्फ राजू चाचा (55), अशोक यादव (56) मोईन शेख (25) आणि नजीर सय्यद हुसेन (वय 59, सर्व रा. कामठी) अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत. पीडित 15 वर्षीय मुलगी ही कामठी परिसरात राहते. तिचे आई-वडील मोल-मजुरी करतात. त्यांना पीडिता व दोन मुले आहेत. आई-वडील मजुरीवर आणि भाऊ शाळेत गेल्यानंतर पीडिता एकटीच घरी राहत होती. तिच्यावर आरोपी मोईनची नजर पडली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तो तिचे शोषण करू लागला. घरी दुध देण्यासाठी येणाऱ्या अशोक यादवला याबाबत समजले. त्यानेही पीडितेचे शोषण सुरू केले.
राजू गबडे हा त्याचा मित्र असून, एका मंदिरात पुजारी आहे. यादवने राजूला याबाबत सांगितले. दुसऱ्या दिवशी राजूही पीडितेच्या घरी गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ही बाब कुलर-पंखा दुरुस्तीचे काम करणाऱ्या नजीर सय्यद हुसेन याला समजली आणि त्यानेही पीडितेवर जबरीने अत्याचार केला. चारही आरोपी पीडितेचे शोषण करू लागले. याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत होते.
दरम्यान, एका शेजाऱ्याला संशय आला. त्याने मुलीच्या नातेवाईकांना याबाबत सांगितले. मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपींचा भांडाफोड झाला. पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी चारही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. न्यायालयाने त्यांना 5 दिवस पोलिस कोठडी सुनावली.