भारताच्या शेजारील या राष्ट्रात ‘हिंदू खतरे मै’; जनतेला हवीय पुन्हा राजेशाही ?
जनतेने दीड दशकापूर्वी राजेशाही उलथवून लावली होती तीच जनता आता देशात पुन्हा राजेशाही आणायची मागणी करत आहेत. या मागणीसाठी जनता रस्त्यावर उतरली आहे.
राजेशाहीच्या समर्थकांनी काठमांडूचा रस्ता थोपवून धरला. ‘राजाला परत आणा, देश वाचवा’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. देशातील सर्वच राजकीय पक्ष भ्रष्ट असल्याचा आरोप जनतेने केला. ते इतर धर्मांचाही प्रचार करत आहेत. अशावेळी राजघराण्याने पुन्हा राज्य करणे हाच उपाय आहे. तो नियम ठरवेल आणि प्रत्येकाने त्यांचे पालन करावे अशी मागणी जनतेने केली. ही मागणी आहे भारताच्या अगदी शेजारचा हिंदू राष्ट्र नेपाळच्या जनतेची.
नेपाळमध्ये बऱ्याच काळापासून राजेशाही अस्तित्वात आहे. जगातील हा एकमेव हिंदू देश. परंतु, लोकशाहीच्या आगमनामुळे हिंदू देश ही ओळख पुसण्याची भीती निर्माण झाली. या देशाने स्वतःला धर्मनिरपेक्ष देश बनवले. नेपाळमध्ये आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ही सर्वात मोठी समस्या आहे. राजकीय पक्षांचा भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणाबद्दल जनता नाराज आहे. त्यामुळेच नेपाळमधील तरुण कामानिमित्त सतत इतर देशांमध्ये स्थलांतर करत आहेत.
नेपाळमधून राजेशाही गेल्यानंतर राजकीय पक्षांनी चीनसोबत जवळीक वाढविली. गुंतवणुकीच्या नावाखाली चीनने नेपाळमध्ये घुसखोरी केली. येथील रस्त्यांपासून विमानतळापर्यंत सर्वत्र चीनचे काम सुरू आहे. येथे चिनी भाषाही शिकवली जाते. अशा परीस्थितीमध्ये नेपाळी जनतेला इतर अनेक देशांप्रमाणे हा अजगर त्यांनाही कर्जात बुडवू शकतो अशी भीती वाटत आहे.
राजेशाही संपल्यानंतर नेपाळमध्ये धर्मांतर झपाट्याने वाढले. नेपाळमध्ये चर्चचे प्रमाण अधिक झाले. जे पूर्वी बौद्ध किंवा हिंदू होते त्यातील दलित समाजात हे धर्मांतर अधिक दिसून आले. नेपाळमध्ये हिंदू लोकसंख्या 81 टक्क्यांहून अधिक आहे. यानंतर 8 टक्के बौद्ध धर्माचे लोक आहेत. यानंतर इस्लामला मानणारे 5 टक्के आहेत. यानंतर ख्रिश्चन धर्म आणि बाकीचे मिश्र धर्माचे लोक आहेत.
गेली काही वर्षात नेपाळमध्ये 7 हजार 758 चर्च बांधण्यात आली. अनेक बौद्ध धर्मियांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यामुळे ख्रिश्चन धर्म सुमारे 11 टक्क्यांनी वाढला आहे. धर्मातराची हीच चिंता देशातील नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे जनतेने पुन्हा राजेशाही राजवटीची मागणी केली आहे.
2008 मध्ये नेपाळचे शेवटचे राजा ज्ञानेंद्र यांना पदच्युत करून जनतेने राजेशाही संपुष्टात आली. या आधी राजघराण्याने सुमारे अडीचशे वर्षे राज्य केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा देशाची धुरा पुन्हा ज्ञानेंद्र यांच्याकडे देण्याची मागणी होत आहे. परंतु, राजेशाहीचा अस्त झाल्यानंतर ते चर्चेत आलेले नाहीत. त्यांच्याकडे बरीच संपत्ती आहे. तसेच, नेपाळ व्यतिरिक्त आफ्रिकन देशांमध्येही त्यांचे काम सुरू आहे. राजा ज्ञानेंद्र हे हिंदू धर्माबाबत कट्टर आहेत. त्यामुळेच ते नेपाळला निश्चितच हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करू शकतील असा विश्वास आंदोलन करणाऱ्यांन वाटत आहे.