Video”गाढवाला चंदन लावलं तरीही ते उकिरड्यावर.”, तुकोबांचा अभंग वाचत देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळंब येथील सभेत आणि धाराशिव येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली.
8.20pm | 9-3-2024 Pune | रा. ८.२० वा. | ९-३-२०२४ पुणे.
LIVE | भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण#Maharashtra #Pune https://t.co/M34n89Nhm6
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 9, 2024
हे तिघे म्हणजे निर्लज्जं सदासुखी आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. संत तुकाराम नाट्यगृहाच उद्घाटन पिंपरीत करण्यात आलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तुकोबांचा अभंग वाचून त्याचा अर्थ सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी केलं महेश लांडगेंचं कौतुक
पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून शहरात विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातल्या शहरांच्या विकासाची दिशा कशी आहे याची माहिती दिली. शहरांच्या विकासामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास कसा रोखता येईल, प्रदूषण कसे कमी करता येईल याची माहिती त्यांनी दिली. तसंच आपल्या खास शैलीत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
तुकाराम महाराजांचा अभंग वाचत उद्धव ठाकरेंना टोला
‘जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नावे हे नाट्यगृह सुरु होतं आहे ही एक प्रकारे त्यांना देण्यात आलेली सांस्कृतिक वंदना आहे. तुकाराम महाराजांचे अभंग सदैव प्रेरणा देणारे आहेत. ते असं म्हणतात, ‘गाढवाचे अंगी चंदनाची उटी, राखेसवे भेटी केली तणे..’ म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरीही तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच. मी कोणाबद्दल बोलतो आहे ते तु्म्हाला माहीत आहे त्यामुळे फार सांगण्याची आवश्यकता नाही. कारण सध्याचा राजकीय धुरळा उडाला आहे. या धुरळ्यात कोण आपल्या अंगाला राख लावून घेतं आहे हे वेगळ्या प्रकारे सांगायची आवश्यकता नाही. पण मला आनंद आहे की तुकाराम महाराजांच्या नावाने अत्यंत सुंदर असं नाट्यगृह उभं राहिलं आहे.’ असं फडणवीस म्हणाले
तर कट्यार काळजात घुसलीच समजा
‘तुकाराम महाराजांचं नाव या नाट्यगृहाला देण्यात आलं आहे. इथे तुम्ही चांगली नाटकं बघालच, पण अलिकडच्या काळात नाट्यगृहाबाहेरच जास्त नाटकं होऊ लागली आहे. मनात येईल तसं कथाकथन लोक करत आहेत. मान-अपमानाचे वेगवेगळे खोटे अंक होत आहेत. संशयकल्लोळही चालला आहे, पण जनता सूज्ञ आहे. त्यामुळेच नटसम्राटासारखं वागलं म्हणून नटसम्राट होता येत नाही हे जरा राजकारणात काही लोकांना मला सुचवायचं आहे आणि तसे ते वागले तर कट्यार काळजात घुसणार आहे आणि त्याची वेदना त्यांना होणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे आमच्या एकनाथ शिंदेंनी डंपर पलटी केलाच आहे. त्यामुळे अधिकचं सांगायची आवश्यकता नाही.’ अशी खुमासदार आणि टोकदार टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली.