शिंदे-पवार गटाला किती जागा? शाहांच्या निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत बैठक,जागावाटपाचा तिढा सुटणार?
अमित शाहांच्या घरी रात्री 1 वाजेपर्यंत बैठक! मुख्यमंत्री, अजित पवार, फडणवीस उपस्थित, दादांना 3-4, शिंदेंना 10-12 जागा, मध्यरात्री काय काय ठरलं?
लोकसभेच्या जागावाटपा संदर्भात भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (Shiv Sena) जागा बदल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची काही तिकीट कापण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
भाजप आणि शिवसेनेमध्ये तीन ते चार जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी कांग्रेस (NCP) पक्षामध्ये देखील उमेदवारांमध्ये काही बदल होण्याचे संकेत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समोर येत आहेत.
शिवसेनेची काही तिकीट कापण्याची शक्यता
सध्या लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबतं सुरु असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याची केल्याची सूचना गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. काही उमेदवार बदलण्याबाबत शाह यांनी सूचना केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेच्या काही उमेदवारांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना साशंकता असल्याचं समजत आहे. अजित पवार मात्र जागा वाढवण्याची मागणी करत असल्याचं सांगितलं जात आहे.
जागावाटपाचा तिढा सुटणार?
जागावाटपावर गृहमंत्री अमित शाहांच्या निवासस्थानी रात्रभर खलबतं सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक मध्यरात्री 1 वाजेपर्यंत बैठक सुरु होती. अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यासोबतही शाहांची अर्धातास स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
शाहांच्या निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागावाटपाबाबत रात्री 1 वाजेपर्यंत बैठक सुरू होती. बैठकीत महायुतीच्या महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी दोन अंकी , अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक अंकी तर उर्वरित जागा भारतीय जनता पक्ष लढेल अशी चर्चा अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत झाल्याची माहिती आहे.
शिंदे-पवार गटाला किती जागा?
अजित पवारांना तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. वायव्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, रामटेक, पालघर, हातकणंगले या जागा भाजप स्वतःकडे घेऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे. अजित पवार गटाला बारामती, शिरुर, रायगड, परभणी या जागा मिळू शकतात, तर शिर्डी आणि यवतमाळचे उमेदवार बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.