लोकसभेच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे मैदानात,भाजपचे मराठवाड्यातील संभावित उमेदवार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाला केंद्रीय नेतृत्वाने पसंती दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे मैदानात उतरताना दिसू शकतात.
भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम
भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम आहे. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे महायुतीतील जागा वाटपांच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजप आणि मित्र पक्षांच्या जागा वाटपावर बुधवारी (दि.6) शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवाय, अमित शाह जागा वाटपचा तिढा सोडवणार असेही बोलले जात आहे.
भाजपचे मराठवाड्यातील संभावित उमेदवार
मराठवाड्यातील हिंगोली, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवार देण्यात येण्याची शक्यता आहे. हिंगोली मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपा तानाजी मुरकुटे यांना मिळण्याची शक्यता आहे. जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून नुकतेच भाजपवासी झालेले बसवराज पाटील निवडणुकीच्या मैदानात असतील असे बोलले जात आहे.