अमेरिकेत विमानतळावर एका व्यक्तीला पकडण्यात आलं, कारण तो असं काही सोबत घेऊन प्रवास करत होता, जे पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. जेव्हा स्निफर डॉगला माणसाच्या पिशवीचा वास आला, तेव्हा तो लगेच भुंकायला लागला.
असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील बोस्टनमध्ये नुकतीच एक अशी घटना घडली ज्याने तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचारी आश्चर्यचकित झाले. ही घटना महिनाभरापूर्वी घडली असली, तरी प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच ही घटना सार्वजनिक केली आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधून परतणारा एक प्रवासी बोस्टन लोगन विमानतळावर उतरला. आफ्रिकेतून आलेल्या या व्यक्तीच्या बॅगमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना काहीतरी विचित्र दिसलं तेव्हा त्यांनी स्निफर डॉगला बॅगचा वास घेण्यास सांगितलं. वास घेताच कुत्रा भुंकू लागला. त्यामुळे त्याच्यात नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं सुरक्षा कर्मचाऱ्यांना समजलं.
याबाबत विचारलं असता त्या व्यक्तीने सांगितलं की, पिशवीत सुके मासे आहेत, जे त्याला खायचे आहेत. मात्र बॅग उघडल्यावर सुरक्षा कर्मचारीही हादरले. त्या पिशवीत 4 मेलेली माकडं होती, जी सुकलेली होती. म्हणजेच त्यांचं शरीर डिहाइड्रेटेड झालं होतं. प्रवाशाने सांगितलं की, त्याने त्या माकडांना खाण्यासाठी सोबत आणलं होतं. सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली.
बॅगेत होती मेलेली माकडं
अमेरिकेत वन्य प्राण्यांच्या कच्च्या किंवा कमी प्रक्रिया केलेल्या मांसावर बंदी आहे. कारण ते देशात रोग पसरवू शकतात. त्याला अमेरिकेत बुशमीट म्हणतात. बुशमीटमध्ये जंतू वाहून येऊ शकतात जे इबोला विषाणूसारखे गंभीर रोग पसरवू शकतात. प्रवक्त्याने सांगितलं, की त्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु त्याचं सामान जप्त करण्यात आलं आणि अधिकारी 4 किलो बुशमीट नष्ट करण्यासाठी त्यांच्यासोबत घेऊन गेले.