शरीरसंबंध ठेवायला नकार दिल्यानं पतीनं पत्नीची केली हत्या..
बिलासपूर : लग्न झालं तरी शरीर संबंधाकरता जोडीदाराची परवानगी व अनुकूलता असणं योग्य समजलं जातं, मात्र अजूनही समाजात शरीर संबंधांना जोडीदारानं विशेषतः पत्नीनं नकार देणं ग्राह्य धरलं जात नाही.
छत्तीसगडच्या बिलासपूर इथं याबाबत एक घटना घडली. शरीरसंबंध ठेवायला नकार दिल्यानं पतीनं पत्नीची हत्या केली. विशेष म्हणजे गुन्हा लपवण्यासाठी स्वतः पतीनंच पोलिसांत तक्रार दिली, मात्र अखेर हा गुन्हा उघडकीस आला व त्याला अटक करण्यात आली.
बिलासपूरच्या रतनपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात एक भयानक घटना घडली. एका नवऱ्याने त्याच्या पत्नीचा अजब कारणावरून खून केला. पत्नीने शरीरसंबंध ठेवायला नकार दिल्याने संतापलेल्या पतीने चक्क तिलाच संपवून टाकलं. पोलिसांना चकवण्यासाठी त्याने स्वतःच तक्रारही दिली.
ही घटना बिलासपूरमधल्या भोंदलापारा इथली आहे. 10 फेब्रुवारीला रात्री साडे अकरा वाजता रूपचंद पटेल (वय 39 वर्ष) यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याची पत्नी सावनी बाई (वय 38 वर्ष) ही कोला-बाडी इथं कोसळली असल्याचं त्यानं त्यात म्हटलं होतं. तो तिला रतनपूरच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात घेऊन गेला. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आरोपी रूपचंदच्या या बोलण्यावर पोलिसांचाही काही काळ विश्वास बसला. पोलिसांनी पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला,पण शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्यात महिलेची हत्या झाल्याचं म्हटलं होतं. तिची गळा दाबून हत्या करण्यात आली होती.
शवविच्छेदन अहवाल पाहिल्यावर पोलिसांनी गंभीरतेनं तपास सुरू केला. तसंच कलम 302 अंतर्गत गुन्हाही दाखल केला. पोलिसांनी 16 तारखेपासून या प्रकरणाची चौकशी सुरू केली. अनेक लोकांची साक्ष घेतल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यानं पोलिसांना फसवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र नंतर पोलिसी खाक्या दाखवल्यावर स्वतःवरचा आरोप कबूल केला. आपण दारू पित असून त्या दिवशीही आपण दारूच्या नशेत असल्याचं रूपचंदनं कबूल केलं. पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं पत्नीकडे शरीर संबंधांची मागणी केली, मात्र पत्नीनं नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर आरोपीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली. गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी त्याची साक्ष घेतली व न्यायालयात सादर करून त्याला तुरुंगात पाठवलं.