मुलीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी तिचा मृतदेह दोन दिवस घरात का लपवून ठेवला ?
उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे मुलीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी तिचा मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवला होता. त्यानंतर दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी मृतदेह गोणीत टाकून विहिरीत फेकून दिला.
सध्या याप्रकरणी पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. तसेच एक जण फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
गेल्या आठवड्यात सुलतानपूर घोष पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात एका विहिरीत एका मुलीचा मृतदेह सापडला होता. मात्र, दोन-तीन दिवस कोणालाच काही कळलं नाही. याच दरम्यान हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी तपास सुरू केला असता, मुलीचा मृत्यू आधीच झाल्याचं समोर आलं. यामागे प्रेमप्रकरण असल्याचं कळलं. अशा स्थितीत कुटुंबीयांची कसून चौकशी केली असता हा भयंकर प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी तिच्या प्रियकराशी बोलायची, याला वडील आणि भावाचा विरोध होता. त्यांनी तिला यावरून दम देखील दिला होता. यानंतर नाराज झालेल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येनंतर बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनी मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवला. नंतर मृतदेहाला दुर्गंधी आल्याने तो गोणीत भरून विहिरीत टाकण्यात आला.
पोलीस प्रकरणामुळे मृताच्या कुटुंबीयांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. मृतदेहाची स्वतः विल्हेवाट लावली. मात्र आजूबाजूच्या लोकांना मुलगी दिसत नसल्याने त्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावर कुटुंबीयांनी ती नातेवाईकाच्या घरी गेल्याची खोटी गोष्ट रचली. मात्र विहिरीत मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. गावकऱ्यांशी बोलल्यानंतर तरुणीचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. अशा स्थितीत कुटुंबीयांची चौकशी केली असता संपूर्ण गुपित बाहेर आले. आमची बदनामी होत असून पोलीस कारवाईला घाबरत असल्याचं वडिलांनी सांगितलं. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.