मला मारण्याचा प्लॅन केला तरी मी मरायला तयार आहे. परंतु आता माघार नाही – मनोज जरांगे पाटील
२० तारखेला मुंबईकडे कूच करण्यासाठी मराठे सज्ज आहेत, पिशव्या भरुन ठेवल्यात.. फक्त पिशव्या उचलून निघायचं राहिलेलं आहे. आता माघार नाही. मुंबईतून आरक्षण घेऊनच परतायचं आहे. कुणी कितीही डाव टाकले तरी मराठे घरात बसणार नाहीत. मला मारण्याचा प्लॅन केला तरी मी मरायला तयार आहे. परंतु आता माघार घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
अंतरवाली सराटीः मराठ्यांचं मुंबईतलं आंदोलन होऊ नये, यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गुरुवारी सायंकाळी सरकारच्या वतीने आमदार बच्चू कडू, मंगेश चिवटे यांच्यासह अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालं होतं.
परंतु ही चर्चा निष्फळ ठरली आहे.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेत सगेसोयरे या शब्दाचा ड्राफ्ट बनवून आणला होता. मात्र जरांगेंनी कळीचा मुद्दा उपस्थित करुन ५४ लाख नोंदींचं काय झालं? हा प्रश्न उपस्थित केला. गावोगावी याद्या लावल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला, मात्र जरांगेंनी अनेक गावांमधले पुरावे देत अशा याद्या लागल्या नसल्याचं सिद्ध केलं.
”आधी ५४ लाख नोंदींच्या आधारे त्या कुटुंबियांना कुणबी प्रमाणपत्र द्या, नंतर ‘सगेसोयरे’ शब्दाचं बघू.. तो नंतरचा मुद्दा आहे. शेतात विहीर खोदण्यापूर्वीच मोटार आणून ठेवण्यात काय उपयोग? त्यामुळे आधी सगळ्यांना प्रमाणपत्र वाटप करा, त्यानंतर ड्राफ्टचं बघू” असं जरांगे म्हणाले. यावेळी मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला. अशा पद्धतीने काम होत असेल तर शंभर वर्षेसुद्धा आरक्षण मिळणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मनोज जरांगे यांचा रौद्रावतार बघून आणि त्यांनी मुद्द्यांच्या आधारे शिष्टमंडळाला निरुत्तर केल्याने बच्चू कडूंना काढता पाय घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. जाताना बच्चू कडूंनी, आता २० तारखेलाच येतो.. असं म्हणत एक प्रकारे आंदोलनावर शिक्कामोर्तब केलं.
”सरकारकडे ज्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्या आधारावरुन मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. २० तारखेला किती प्रमाणपत्र वाटप केले, त्याचा आकडा जाहीर करावा. त्यानंतरच मग नातेवाईकांच्या आरक्षणाचं बघू. आधीच त्याच्यावर वेळ घालवण्यचं कारस्थान सुरु आहे.” असा आरोप जरांगेंनी केला.