‘लेक लाडकी’ योजनेचा या शिधापत्रिका धारकांना १ लाख रुपये, ‘असा’ मिळेल लाभ
मुलींचा जन्मदर वाढून मृत्यूदर कमी करण्यासोबतच मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाकडून ‘लेक लाडकी’ ही योजना राबविण्यात येत आहे. पिवळ्या, केशरी शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ती १८ वर्षाची झाल्यानंतर तिला १ लाख रुपये मिळणार आहे.
राज्य शासनाकडून १ एप्रिलपासून ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असून, या योजनेतील लाभाची रक्कम लाभार्थ्यांना ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी)द्वारे बँकेत जमा होणार आहे. १ एप्रिल २०२३ नंतर ज्यांना एक मुलगी व मुलगा आहे अशांना ही योजना लागू राहणार आहे. यासह ज्यांना एकच मुलगी आहे, दोन्ही मुली आहेत, असे कुटुंबीय या योजनेस पात्र ठरणार आहेत.
मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च शासनाकडून एकूण पाच हप्त्यांमध्ये उचलण्यात येणार आहे. या ‘लेक लाडकी’ योजनेची ग्रामीण भागात लाभार्थीं पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, नागरी भागात मुख्य सेविकांची राहणार आहे. लाभार्थींची माहिती ऑनलाईन भरावी लागणार आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून करण्यात येत आहे.
असा मिळेल लाभ
पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना त्यांच्या कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळतील. मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येईल.
‘लेक लाडकी’ योजना ही राज्य शासनाकडून मुलींच्या शिक्षण व जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक पात्र लाभार्थी याचा लाभ मिळत आहे.