साखरेच्या दरात मोठी घसरण; कारखानदारांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर!
केंद्र सरकारने अलीकडेच उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली आहे. मात्र यामुळे साखर उद्योगावर (Sugar Rate) विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. निर्णय लागू होताच साखरेच्या दरात (Sugar Rate) प्रति क्विंटलमागे 100 रुपये इतकी घट नोंदवली गेली असल्याचे साखर उद्योगातून सांगितले जात आहे.
देशातील सर्वच राज्यांमध्ये साखरेच्या दरात ही घसरण झाली आहे.
1.6 दशलक्ष टन अतिरिक्त उत्पादन (Sugar Rate Decreases In India)
महिनाभरापूर्वी असलेले 3700 ते 3800 रुपये प्रति क्विंटल साखरेचे दर 3500 ते 3600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. दिवाळीनंतर मागणीत घट आल्यानंतर दर स्थिर काहीसे स्थिर होते. मात्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीवरील बंदीच्या निर्णयानंतर साखरेच्या दरात दररोज 10 ते 20 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. साखर उद्योगतातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, ‘यावर्षी उसाचा रस/साखर सिरपमधून 137 कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. आतापर्यंत 12 ते 14 कोटी लिटरचा पुरवठा करण्यात आला आहे. सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता सुमारे 120 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन रद्द करावे लागणार आहे. यामुळे आता अंदाजे 1.6 दशलक्ष टन साखरेचे जास्तीचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे साखरेच्या दरात आणखी घसरण नोंदवली जाऊ शकते.’
साखर उद्योगाला मोठा फटका
देशांतर्गत बाजारासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. यावर्षीच्या हंगामात सुरुवातीचा साठा सुमारे 50 लाख टन असून, उत्पादनाचा अंदाज 30 दशलक्ष टन होता. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे साखरेचे उत्पादन 31.5 दशलक्ष टनांपर्यंत नोंदवले जाऊ शकते. ज्यामुळे सुमारे 28.5 दशलक्ष टनांच्या वापरासह, सुमारे 3 ते 3.5 दशलक्ष टन साखर अतिरिक्त साठा याद्वारे निर्माण होण्याची शक्यता आहे. गरज नसताना केंद्राने साखर उद्योगात हस्तक्षेप केल्याने साखर उद्योग नाराज असल्याचे सध्याचे चित्र आहे. एकदम निर्णय लादताना घिसाडघाई केल्याने साखरेचे अर्थकारण धोक्यात आले आहे. यामुळे साखर कारखानदारांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.