सिंधुताई सपकाळ यांचे खासगी सचिव आणि त्यांचे पुत्र अरुण सपकाळ यांच्यामध्ये वारस हक्कावरुन सुरु झालेला वाद थेट कोर्टामध्ये
सिंधुताई सपकाळ यांच्या वारस हक्कावरुन वाद होण्याचे शक्यता आहे. सिंधुताई सपकाळ यांचे खासगी सचिव आणि त्यांचे पुत्र अरुण सपकाळ यांच्यामध्ये वारस हक्कावरुन सुरु झालेला वाद थेट कोर्टामध्ये पोहोचला आहे.
सिंधुताई सपकाळ यांच्या खासगी सचिवाने स्वत:च्या नावामागे सिंधुताईंचे नाव लावून त्यांचा वारस होण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आक्षेप अरुण सपकाळ यांनी घेतला असून थेट कोर्टात याचिका दाखल केली आहे.
“सिंधुताईंचे 4 जानेवारी 2021 ला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पुण्यातील संस्थेचा कारभार पाहणारे त्यांचे खासगी सचिव विनय नितवणे यांनी स्वत:च्या नावात बदल करुन राजपत्राद्वारे नावामागे सिंधुताई संपकाळ यांचे नाव लावले आहे. जी मुलं अनात आहेत अशाच मुलांच्या नावांमागे सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावले जाते. मात्र नितवणे अनाथ नसूनही त्यांनी सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावले आहे. त्यांच्या नावाचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने न्यायालयात मी दाद मागितली आहे,” असं अरुण सपकाळ यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. ‘विनय नितवणे यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत काम करावं, समाज कार्य करावं याला आमचा कोणत्याही प्रकारे कोणताही आक्षेप नाही. मात्र अनाथ नसताना स्वत:च्या नावामागे सिंधुताईंचे नाव लावण्यावर आमचा नक्कीच आक्षेप आहे,’ असंही अरुण सपकाळ म्हणाले.
नितवणे हे सिंधुताईंबरोबरच राहायचे. सिंधुताईंमुळे अनेक मान्यवरांशी त्यांचा परिचय झाला. आता सिधुताईंचे नाव लावून त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा प्रश्न अरुण सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. ‘या प्रकरणामध्ये आधी मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलेली. हाय कोर्टाने आधी कनिष्ठ कोर्टात जाण्यास सांगितलं. त्यामुळे अचलपूरमधील कोर्टात याचिका दाखल केली,’ असं अरुण सपकाळ यांनी सांगितलं.
अरुण सपकाळ यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात विनय नितवणे यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. “मी नावामागे सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावण्याबाबत अरुण सपकाळ यांनी घेतलेला आक्षेप हा गैरसमजातून घडला आहे. हा फक्त कौटुंबिक वाद आहे. मी लहानपणापासूनच सिंधुताई सपकाळ यांच्याबरोबर राहिलो आहे. मी सिंधुताईंचे नाव लावल्याने अरुण सपकाळ नाराज झालेत. ही नाराजी लवकरच दूर होईल,” असा विश्वास विनय नितवणे यांनी व्यक्त केला आहे.
मात्र दुसरीकडे आपण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्येही विनय नितवणेंविरोधात तक्रार दाखल करणार आहोत असं अरुण सपकाळ म्हणाले आहेत. अरुण सपकाळ हे सध्या चिखलदा येथे सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या मुलींच्या अनाथाश्रमाचं व्यवस्थापन करतात.