‘कदाचित हे शुभसंकेत..’ 3 राज्यातील पराभवानंतरही उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मुंबईःशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नेत्यांचा आज सन्मान सोहळा विलेपार्ले इथं पार पडला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या नेत्यांचा सन्मान करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कार्यकारिणीचा विस्तार केला होता. तीन खासदारांसह सहा जणांची नेतेपदी नियुक्ती केली होती. या नव्या नेते मंडळींचा आज सन्मान करण्यात आला. विलेपार्ले पूर्व येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे ‘सन्मान सोहळा’ पार पडला. या सन्मान सोहळ्यात नवनियुक्त शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, राजन विचारे, शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांना सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चार राज्यातील विधानसभा निकालांवरही भाष्य केलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
बऱ्याच दिवसांनी अशा कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. संजय तुम्हाला खास धन्यवाद. प्रत्येकवेळी सगळ्यांना सगळं देता येत नाही. हल्ली ज्यांना सगळं दिलं की तो जातो. देताना भीती वाटते. संजयजींचं कौतुक आहे. आज काय बोलू हा प्रश्न आहे, अनिल देसाईला मी अनिल बोलायचो. वाढदिवस समजला तेव्हा कळलं माझ्याहून मोठाय, वयानं मोठा असला तरी मनानं तरूण आहे. वय सगळ्यांना गाठतं, शरीर थकतं पण मनानं थकलेलं वृद्ध इथ कुणी नाही, शिवसेनाप्रमुखांनंतर मला नेता मानता जनतेचे आभार. सत्ता काय परत येणार, परत आणणार. जे जे जिंकले त्यांचं अभिनंदन, यालाच लोकशाही म्हणतात. 2024 नंतरही अशा निवडणुका होत राहाव्या. लोकशाहीत यथा प्रथा तथा राजा, हे लोकांनी ठरवलं पाहिजे.बाबुलजींचंही कौतुक, बंगालची परंपरा आहे, अन्याय के खिलाफ लढो, बंगाल आणि महाराष्ट्राची ही परंपरा पुढं न्यायची आहे. मिंधे गेलेत तिकडे त्यांना कळत नाहीय आपण काय करतोय, गद्दारी सेनेशी नाही महाराष्ट्राशी, मातीशी करताय, आईची विटंबना करताय. बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे क्या देश को भी बचाएंगे, पद येतं जातं, सोन्यासारखे शिवसैनिक सोबत असतील तर काय? आता मतदान पण कीबोर्डवर होतं, कळत नाही कोण कोणाचा आवाज काढतंय. बाबुल सुप्रियोंना, मिले सूर मेरा तुम्हारा. यांना संपवल्याशिवाय राहणार नाही. स्वाभिमान, आत्मविश्वास जो भिनवलाय तो पुढे नेण्यासाठी या नेत्यांची निवड केली. नेते आणि शिवसैनिक यांच्यात मी फरक करत नाही.
माझ्यापेक्षा मोठा गटप्रमुख आहे. त्यांच्यामुळे आमदार, खासदार निवडून येतात, तो मजबूत आहे तोपर्यंत हे कितीही जिंकूदे, माझं आव्हान आहे महाराष्ट्रात. हरलो त्याचं दुःख असेल पण कदाचित हे पुढचे शुभसंकेत आहेत. कारगिल युद्धानंतर निवडणुका लवकर घेतल्यावर आपलं सरकार आलं, खाली दांडी उडाली. गेल्या निवडणुकांमध्ये छत्तीसगढ राजस्थान आणि मध्यप्रदेशात तिन्ही राज्यात कांग्रेस जिंकली होती पण संसदेत काय झालं उलट झालं, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.