पक्ष्याची धडक अन् ७५० कोटींचं F-35 फायटर जेट बनलं भंगार
सर्वात महागडे आणि आधुनिक लढाऊ विमान मानले जाणारे एफ-३५ स्टील्थ फायटर जेट केवळ एका पक्ष्याशी धडक झाल्यानंतर निकामी झाल्याने जगभरातील संरक्षण तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. दक्षिण कोरियन हवाई दलाने गतवर्षी पक्ष्याशी धडक झाल्यानंतर विमानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने F-35A स्टील्थ विमानाला आता सेवेतून निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
जानेवारी २०२२ मध्ये एका प्रशिक्षणादरम्यान, एक पक्षी आदळल्यानंतर दक्षिण कोरियन एफ-३५ च्या पायलटाला बेली लँडिंग करावं लागलं. त्यामुळे एफ-३५ च्या उड्डाण यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता.
याबाबत प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार त्यावेळी दक्षिण कोरियाच्या हवाई दलानं सांगितलं होतं की, एफ ३५ विमानाला एरा १० किलो वजनाच्या गरुडाची धडक बसली होती. या धडकेमुळे विमानातील हायड्रोलिक डक्ट आणि वीजपुरवठा करणाऱ्या केबलचं नुकसान झालं होतं. त्यामुळे लँडिंग गिअर चालवण्यामध्ये अडखळे आले. त्यामुळे अखेरीस वैमानिकाला बेली लँडिंग करावं लागलं. सुदैवाने या दुर्घटनेत वैमानिक सुखरूप बचावला.
मात्र या विमानाच्या दुरुस्तीचा खर्च ऐकून दक्षिण कोरियाच्या हवाई दलाला धक्का बसला. या विमानाची निर्मिती करणाऱ्या लॉकहीड मार्टिन कंपनीने विमानातील ३०० महागड्या आणि आवश्यक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले. तसेच त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ९०० कोटी रुपये खर्च होईल असे सांगितले. ही रक्कम विमानाची खरेदी किंमत असलेल्या ७५० कोटी रुपयांपेक्षा अधिक निघाली. हा खर्च पाहून हवाई दलाने या विमानाला सेवेतून निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. सध्या दक्षिण कोरियाच्या हवाई दलाकडे ४० एफ-३५ ए विमानांचा ताफा आहे.