पहिली बायको होती घरी अन् दुसरी पत्नी घेऊन आला, पुढे काय घडलं असं?
मॅट्रिमोनियल साइटवर एका युवक-युवतीची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी कोर्ट मॅरेजही केलं. पण जेव्हा युवती तिच्या पतीच्या घरी म्हणजे सासरी गेली, तेव्हा तिनं ज्या युवकाशी लग्न केलं होतं, त्या युवकाचं आधीच लग्न झालं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
त्यानंतर वधूने थेट पोलीस ठाणं गाठून स्वतःच्या पतीविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये हा प्रकार घडलाय.
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक मुलगी लग्न करून जेव्हा सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तिने ज्या तरुणाशी लग्न केलं होतं, त्या तरुणाचं अगोदरच लग्न झालं होतं. घरामध्ये त्याची पहिली पत्नी व एक मुलगा राहत होते. पहिल्या पत्नीने जेव्हा तिच्या पतीला दुसऱ्या पत्नीबरोबर पाहिलं, तेव्हा तर घरामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला. त्यानंतर नववधूने म्हणजेच तरुणाच्या दुसऱ्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपीवर लवकरच कारवाई केली जाईल, असं पोलीस अधिकारी अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितलं.
नेमका काय आहे प्रकार?
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे राहणारी पूजा सोमवारी (27 नोव्हेंबर 2023) पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिथे तिने रोशन नावाच्या युवकानं लग्न करून फसवणूक केल्याची तक्रार दिली. पीडितेनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, ‘मॅट्रिमोनियल साइट shaadi.com द्वारे रोशन नावाच्या तरुणाशी माझी भेट झाली होती. रोशन हा लखनऊचा रहिवासी आहे. आम्ही एकमेकांना फोन नंबर दिले, व आमच्या दोघाचं नियमित बोलणं सुरू झालं. आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो, व त्यामुळे आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.’
‘रोशन मला भेटण्यासाठी कोलकात्याला आला, व आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर रोशन मला घेऊन त्याच्या घरी म्हणजेच माझ्या सासरी पोहोचला, तेव्हा तिथे एक महिला आणि एक मुलगाही होता. ती महिला दुसरी कोणी नसून रोशनची पहिली पत्नी असल्याचं मला समजलं. तसेच तो मुलगा रोशनचा मुलगा होता. हे पाहून मला धक्काच बसला,’ असेही पीडितेनं पोलिसांना सांगितलं आहे.
तडजोड करून रोशनसोबत राहण्यास पीडित मुलगी तयार होती. मात्र, रोशनच्या पहिल्या पत्नीने त्यास नकार दिला व पीडितेला मारहाण केली. अखेर पीडितेने पोलीस स्टेशन गाठत रोशनविरोधात तक्रार दिली असून, पोलिसांनी त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, या प्रकरणाची लखनऊ परिसरात जोरदार चर्चा सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.