धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून भोंदूबुवासमोर पत्नीची विवस्त्र पूजा
पन्हाळा : चोरीच्या संशयावरून भोंदूबुवासमोर पत्नीची विवस्त्र पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार पन्हाळा तालुक्यातील एका गावात घडला.
यानंतर संबंधित महिलेने फिर्यादी दिली.
त्यानुसार पन्हाळा पोलिसांनी (Panhala Police) अमानुष, अनिष्ट व अघोरी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबुवा रामू कोलकर ऊर्फ रामा मिस्त्री याच्यासह पती आणि सासूवर गुन्हा नोंद केला आहे
पोलिसांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी घरातील सोन्याची चेन चोरीस गेली होती. त्याची चौकशी करण्यासाठी पीडितेचा पती भोंदूबुवाकडे गेला. तेव्हा त्याने ती चेन तुझ्या पत्नीने चोरून तिच्या आईला दिली आहे, असे सांगितले. दुसरीकडे भोंदूबुवा पीडितेकडे शरीर संबंधाची मागणी करीत होता. त्याला तिने दाद दिली नाही.
एक दिवस पतीने पीडितेला चोरीचा जाब विचारला व या संशयाची शहानिशा करण्यासाठी भोंदूबुवाच्या मदतीने पूजा करण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने आईला सोबत घेऊन भोंदुबुवासमोर पत्नीची विवस्त्र पूजा केली. याबाबत महिलेने पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार ऑगस्टमध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.