मोठी बातमी बीड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू
बीड: जिल्ह्यात मराठा समाजास सरसकट कुणबी आरक्षण देण्याबाबत आंदोलने, उपोषण सुरु आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलनांनी उग्ररुप धारण केले आहे. सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्याने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी सोमवारी रात्री आठ वाजता तत्काळ संचारबंदी आदेश लागू केले आहेत.
हे आदेश जारी झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी पोलिस विभागाने सुरू केली.
जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरु आहेत. परंतु त्या आंदोलनास हिंसक वळण मिळाले आहे. दरम्यान, आंदोलकांनी सोमवारी विविध शासकीय कार्यालयांवर मोर्चे काढून कार्यालये बंद केले. काही ठिकाणी कार्यालयास आगी लावणे व दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. यामुळे सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात चालु असलेल्या आंदोलनांमुळे सार्वजनिक व खासगी मालमत्तेस मोठ्या प्रमाणावर हानी पोहचत आहे. याबाबतची खात्री झाल्याने जिल्हाधिकारी मुधोळ यांनी संचारबंदीचा आदेश लागू केला आहे.
पुढील आदेशापर्यंत संचारबंदी
संचारबंदी आदेशानुसार बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटरच्या हद्दीपर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.