बीड भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू
बीड : धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला व्यंको कंपनीकडे वळण घेत असताना नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.
अपघातबीड नगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव नजीक बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडला.
आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक ( क्र. MH 21 X 8600 ) हा धामणगाव कडून अहमदनगर दिशेने जात होता. रात्री साडे अकरा वाजेदरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने (क्र. MH 16 Q 9507 ) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, वय 35, रा. धामणगाव ता. आष्टी, मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे, दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर डाॅ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, वय 35, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी यांचा मॅक केअर हाॅस्पीटल, अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, वय 45, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर मॅक केअर हाॅस्पीटल अहमदनगर येथे उपचार चालु आहेत.