नोकरीसाठी भावानेच काढला सख्ख्या बहिणींचा काटा; खूनाचा बनाव रचला, पण….
रेवदंडा : भावानेच दोन सख्ख्या बहिणींना विष देऊन हत्या केली. गुन्ह्याची आखणी, ते प्रत्यक्षात उतरवणे आणि त्यानंतर तपास यंत्रणेला गुंगारा देणारा हा प्रकार एखाद्या थरार चित्रपट कथेला शोभेल असाच आहे. १६ ऑक्टोबरला घडलेल्या या घटनेची सत्यता समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. गणेश मोहिते असे आरोपीचे नाव आहे. त्याला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
वनविभागात असलेल्या वडिलांचे ऑनड्युटी २००९ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर वडिलांच्या मालमत्तेत कोणीही वाटेकरी होऊ नये, असे गणेश मोहिते याला वाटत असे. त्यानुसार त्याने वडिलांची सर्व मिळकत कोणीही वारस नाही, असे दाखवून आपल्या नावावर करून घेतली. मुलाची लक्षणे बरोबर नसल्याने त्याच्या आईने अनुकंपावर नोकरीसाठी मोठ्या बहिणीची शिफारस केली होती. हे गणेशला सातत्याने खटकत होते. अशा परिस्थितीही आईला मिळणारी पेन्शन आणि नोकरी लागल्यानंतर मिळणाऱ्या पगारातील काही भाग बहिणींना देण्याच्या करारावर गणेशला वनविभागात अनुकंपावर नोकरी देण्यास नाहरकत दिली होती.
याच दरम्यान बहिणींची लग्ने होऊन त्या सासरी जातील, असे त्याला वाटत होते; परंतु तसे झाले नाही. बहिणी सतत त्याच्यासोबत वाद घालत होत्या. या गोष्टीचा मनात राग धरून त्याने दोन्ही बहिणींना फिल्मी स्टाईलने संपवायचे ठरवले. त्यानुसार घटस्थापनेच्या दिवशी सूपामध्ये विष टाकून दोघा बहिणींचा काटा काढला. त्यानंतर त्याने दोघींच्या मृत्यूस शेजारी राहणारी काकी कारणीभूत असल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी तपास यंत्रणा वेगात फिरवली आणि गणेशला ताब्यात घेतले. या वेळी त्याने आपणच दोन्ही बहिणींना संपवल्याची कबुली दिल्याचे अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या अधिपत्याखाली उपनिरीक्षक विशाल शिर्के, धनाजी साठे, विकास चव्हाण, पोलिस हवालदार प्रतिक सावंत यांनी केला आहे.
मोबाईलवरून विषप्रयोगाचा शोध
रेवदंडा येथील चौल-भोवाळे येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय सोनाली मोहिते हिचे जिल्हा रुग्णालयात १६ ऑक्टोबरला निधन झाले. त्यानंतर चारच दिवसांनी तिची लहान बहीण स्नेहल हिचाही सारख्याच लक्षणाने मृत्यू झाला. या दोघींच्या मृत्यूस शेजारी राहणारी काकी कारणीभूत असल्याचा बनाव मोठा भाऊ गणेश मोहिते यांनी रचल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. रचलेल्या बनावाप्रमाणे त्यांच्या आईने आणि मृत्यूपूर्वी स्नेहल हिनेही जबाब दिला होता; परंतु तपास यंत्रणेला वेगळाच संशय येत होता. गणेशच्या मोबाईलमधील माहिती तपासण्यात आली. त्यानंतर त्याने ५३ वेगवेगळ्या विषारी द्रव्य निर्मितीच्या साईट मोबाईलवर पाहिल्या होत्या. त्याच्या गाडीच्या डिकीतही विषारी पदार्थ सापडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर सर्व प्रकार त्याने अगदी पोपटाप्रमाणे बोलून दाखवला.