सणासुदीत विजेची टंचाई भासणार नाही;कोळसा पुरवठा 6 टक्क्याने वाढवून 23.5 दशलक्ष टन एवढा करण्यात आला.
उत्सवात विजेची टंचाई भासू नये याकरिता वीज कंपन्या वीज उत्पादनात वाढ करणार आहेत. त्यासाठी आवश्यक एवढा कोळसा या कंपन्यांना पुरविण्यात आला असल्याचे कोल इंडिया कंपनीने म्हटले आहे.
कोल इंडियाने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात कोळसा पुरवठा 6 टक्क्याने वाढवून 23.5 दशलक्ष टन एवढा करण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात भारतात विजेची मागणी वाढते. ही बाब ध्यानात घेऊन या पुरवठ्यात वाढ करण्यात आली असल्याचे या कंपनीने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वीज कंपन्यांना कोल इंडियाकडून 22.2 दशलक्ष टन एवढ्या कोळशाचा पुरवठा करण्यात आला होता. यावर्षी बऱ्याच राज्यात पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे तापमानात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विजेची मागणी वाढते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.