सावधान! राज्यात पुढील ३-४ तासांत मुसळधार पाऊस..
गणपती बाप्पाच्या आगमनानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहेत. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे.
दरम्यान, येत्या ३-४ तासांत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना ढगांच्या गडगडाचा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार
राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर , जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या ३ ते ४ तासांत जळगाव, रायगड, रत्नागिरी, बीड तसेच धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे.
आज हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच शुक्रवारी विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळेल. यापार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस
दरम्यान, गुरुवारी (२१ सप्टेंबर) दिवसभरात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं. नागपुरातील काटोल तालुक्यात २४ तासांत विक्रमी पाऊस (Rain Alert) झाला. पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून लाडगाव परसोडी गावातील लोकेश नासरे यांच्या शेतात तोडून ठेवलेली 6 टन मोसंबी पुराच्या पाण्यात वाहून गेली. यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शहरासह तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.हाच पाऊस पुढच्या काही दिवसांमध्ये असाच सक्रिय राहिल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.