मुलींची छेड काढाल तर लक्षात ठेवा, यम वाट बघतोय
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुली, महिलांची छेड काढणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. मुलीबाळींची छेड काढणारे थेट यमसदनी पोहोचतील, असं ते म्हणाले.
ओढणी खेचल्याने सायकलवरून पडल्यानंतर दुचाकीखाली चिरडून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. राज्यातील आंबेडकरनगरमध्ये ही धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली होती. या घटनेतील तीन आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याकडून रायफल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी प्रत्तुत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोघा आरोपींच्या पायावर गोळी लागली होती. तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिसऱ्या आरोपीचा पाय मोडला होता.
या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोडरोमिओंना इशारा दिला आहे. गोरखपूरच्या मानसरोवरमधील रामलीला मैदानात ३४३ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केले.
कायदा हा सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आहे. कायदा मोडण्याचा कुणालाही अधिकार नाही. रस्त्यावरून जाताना कुणी मुलींची छेड काढल्यास ते यमसदनी पोहोचतील, असा इशारा त्यांनी दिला.
नेमकं काय घडलं होतं…
आंबेडकरनगरच्या हंसवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हीरापूर बाजारात १५ सप्टेंबरला एका मुलीची रोडरोमिओंनी छेड काढली. विद्यार्थिनी शाळेतून सायकलवरून घरी जात होती. धावत्या सायकलवर बसलेल्या मुलीची ओढणी त्या तिघा आरोपींनी खेचली. त्यामुळे ती रस्त्यावर पडली. पाठीमागून येणाऱ्या दुचाकीच्या चाकाखाली आल्याने जखमी होऊन तिचा मृत्यू झाला होता.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. काल, १७ सप्टेंबरला त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.