प्रशासनाच्या विनंतीनंतर साताऱ्यातील सामाजिक संघटनांनी उद्याचा मूक मोर्चा केला रद्द
पुसेसावळी, ता. खटाव येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. १६) सामाजिक संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येणार होता परंतु सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अशांतता निर्माण होऊ नये, म्हणून मोर्चा रद्द करण्याची विनंती पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली.
ती विनंती मान्य करून शनिवारचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.
पुसेसावळी येथे घटनेच्या निषेधार्थ अनेक सामाजिक संघटनानी मुक मोर्चा काढण्याची भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समिर शेख यांनी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. सण-उत्सवात कोणत्याही प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होऊ नये. यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. संघटनांनी मोर्चा काढू नये, अशी विनंती करण्यात आली.
पालकमंत्री लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या विनंतीला सर्व सामाजिक संघटनांनी प्रतिसाद देऊन उद्याचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला. गणेशोत्सव आणि रमजान ईद हे सण तोंडावर असल्याने सामाजिक शांतता व सलोखा अबाधित राहावा, यासाठी मूक मोर्चा काढण्याचा निर्णय रद्द करण्याची भूमिका घेतल्याचे सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात उसळलेल्या दंगलीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तीन दिवस इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. यामुळे सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले होते. शैक्षणिक आणि शासकीय कामांवर परिणाम झाला होता. प्रशासनाने शांतता कमिटीच्या बैठका घेऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी सहकार्याची विनंती केली. तसेच चोख बंदोबस्त ठेवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे.