शेत-शिवार

रब्बीसाठी दीड लाख टनावर खतांची मागणी


रब्बी हंगामात चार लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यासाठी एक लाख ७१ हजार टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. बाजारात आजघडीला एक लाख टन खते शिल्लक असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळाली.जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण बरे असल्यामुळे रब्बीमध्ये पेरणीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. रब्बीमध्ये सव्वादोन लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत चार लाख हेक्टरवर पेरणी होईल, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त करून खते व बियाण्यांचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यात यंदा आजपर्यंत ७८१.४० मिलिमीटरनुसार वार्षिक सरासरीच्या ८७.७४ टक्के पाऊस झाला आहे. परिणामी, रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त करून वाढीव क्षेत्राबाबत नियोजन केले आहे. यात बियाणे तसेच खताच्या उपलब्धतेबद्दल नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत.

यानुसार कृषी विभागाने रब्बी पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात रब्बीमध्ये सरासरी खताचा वापर एक लाख ५५ हजार टन आहे. रब्बीसाठी यंदा एक लाख ७१ हजार २३० टनाची मागणी कृषी विभागाने राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे केली आहे. आजअखेर एक लाख टन खताचा साठा शिल्लक, असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

रब्बीत चार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख २४ हजार ६३४ हेक्टर आहे. या तुलनेत यंदा चार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. यात सर्वाधिक तीन लाख ९१ हजार हेक्टरवर हरभरा पेरणीचा अंदाज आहे. यासोबतच गहू ४४ हजार हेक्टर, रब्बी ज्वारी २८ हजार हेक्टर, करडई साडेपाच हजार हेक्टर, रब्बी मका साडेसात हजार हेक्टरवर पेरणी होईल अशी माहिती दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button