पिंपरी-चिंचवड : शिवमहापुराण कथा सोहळ्याची उत्कंठा शिगेला!
महाराष्ट्रामध्ये प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा विनामूल्य श्री अष्ठविनायक शिवमहापुराण कथा वाचन सोहळा पिंपरी-चिंचवडमध्ये होत आहे.
त्यामुळे तमाम शिवभक्तांची उत्कंठा शिगेला पोहोचली असून, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवकथा वाचक पंडित प्रदिप मिश्रा यांचे शहरात आगमन झाले. शहरवासीयांच्या वतीने त्यांचे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी स्वागत केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार च्यावतीने श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचे आयोजन दि. १५ ते २१ सप्टेंबर २०२३ दरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी येथे केले आहे. परमपूज्य पंडित प्रदिप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून हा अभूतपूर्व अध्यात्मिक सोहळा रंगणार आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिव पुराण कथा मोफत वाचन सोहळा आहे.
मध्यप्रदेश येथील प. पु. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून ही कथा ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडवासीयांना मिळणार आहे. पंडित मिश्रा यांचे लाखो अनुयायी कथेचे श्रवण करण्यासाठी येणार आहेत. या दिवसांमध्ये सुमारे आठ ते नऊ लाख श्रोते या कथेचे श्रवण करतील. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठीत केली आहे. त्यामध्ये २५ उपसमिती आहेत.