सारे विश्व आयुर्वेदाच्या मागे: मंत्री श्रीपाद नाईक
मडगाव : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर योग व आयुर्वेद उपचारांना चालना मिळाली. आज विश्व आयुर्वेदाच्या मागे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
येथे आयुर्वेद शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला मिरॅकल ड्रिंक निओ आयुर्वेदचे संचालक तथा माजी आयएएस अधिकारी डॉ. एस. एम. राजू डॉ. स्नेहा भागवत, वितरक श्याम प्रभुगावकर, शोभा प्रभुगावकर, श्रुती प्रभुगावकर उपस्थित होत्या. मंत्री नाईक म्हणाले की, भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारांनी योग आणि आयुर्वेद या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी आयुर्वेदाला सरकारचे पाठबळ मिळाले नाही. मात्र, नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम योग आणि आयुर्वेद उपचारांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आज सारा देश आणि विश्वही आयुर्वेद उपचारांकडे वळले आहे.
आज आयुर्वेदाचा प्रसार होत असला, तरी त्यापुढे अनेक आव्हाने आहेत. भारत देश हा आयुर्वेदाचा विश्वगुरू बनला आहे, असे डॉ. एस. एम. राजू म्हणाले. डॉ. भागवत यांनी आयुर्वेद उपचारांची माहिती आणि फायदे सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनी विचार व्यक्त करताना आयुर्वेदाचे महत्त्व सांगितले. शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत अग्नी यांनी सूत्रसंचालन केले.