मोठ्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात; ‘या’ भागाला अलर्ट जारी
मुंबई:मागील तीन आठवड्यांपासून खंड पडलेला पाऊस राज्यात पुन्हा सुरू झाला आहे. पुणे, मुंबईसह अनेक भागात आज पावसाला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी रात्रीपासून पावसाच्या सरी बरसत होत्या.
मुंबईतही रिमझिम पाऊस सुरु आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्याची गती वाढली असल्यामुळे पावसाला सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाने शनिवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. तसेच 48 तासांत राज्यात हलक्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबईतील कुर्ला पश्चिमेत सीएसटी रोडवर परिसरात पावसाचा जोर जास्त असल्याने पाणी साचल्याचेही पाहायला मिळाले.
दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. अंदाजाप्रमाणे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे. राज्यात पावसाने मोठा ब्रेक घेतल्याने पावसाचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यावर दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे. मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात पावसाची एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरीही या भागांमध्ये दरडी कोसळण्याचे सत्र सध्या सुरुच आहे. मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन आपल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करत आहे.