उदयनराजे व रामराजे रंगले हास्यविनोदात..
सातारा :अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये सुसंवाद दिसून आला.
उभयंतांमध्ये झालेल्या हास्यविनोदाने उपस्थित संचालकांचे त्यांनी लक्ष वेधून घेतले.
रामराजे नाईक निंबाळकर व उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय सख्य जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय असतो. दोघांमध्ये ऑलवेल नसल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच असते. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या दरम्यान उदयनराजे यांनी रामराजे यांची कमराबंद घेतलेली भेट सुद्धा चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी निघून गेले आहे. उदयनराजे भाजपचे खासदार म्हणून केंद्राच्या राजकारणात स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करीत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घडामोडींनंतर अजितदादा पवार यांच्या गटात सामील झाल्यापासून रामराजे फलटणमध्ये पुन्हा नव्याने बांधणी करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अशा राजकीय परिस्थितीमध्ये जिल्हा बॅंकेच्या सभेत दोन्ही राजांची गाठ पडली. रामराजे व उदयनराजे यांनी शेजारी शेजारी बसून हास्यविनोद केले.
दोघांची देहबोली सकारात्मक दिसून आली. बॅंकेच्या अनेक योजनांविषयी त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. बॅंकेने फिनॅकलसारख्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्यामुळे ग्राहकांना उत्तम आणि जलद सेवा मिळणार आहे. तसेच बॅंकेने आधुनिक तंत्रज्ञान म्हणून आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करावा, अशी सूचना रामराजे यांनी केली. तर उदयनराजे भोसले यांनी बॅंकेच्या अमृत महोत्सवी वर्षातील प्रगतीचे तोंडभरून कौतुक केले. कोणत्याही खासगी व्यापारी आणि सहकारी बॅंकेला तगडी स्पर्धा देण्यासाठी जिल्हा बॅंक सक्षम आहे.
तसेच शेतकऱ्यांचे हित, विद्यार्थ्यांचे हित जपण्यामध्ये बॅंकेने पुढाकार घेतला असून बॅंकेची सामाजिक बांधिलकीही कौतुकास्पद आहे, असा शब्दांत उदयनराजे यांनी बॅंकेवर स्तुतीसुमने उधळली. दोन्ही राजांमधला सकारात्मक संवाद बॅंकेच्या संचालकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला धावती भेट देणारे उदयनराजे सर्वसाधारण सभेमध्ये आज तब्बल दोन तास ठिय्या देऊन होते.