डोळे येण्यावरील औषधांचा रत्नागिरीत तुटवडा, कोल्हापूरहून औषधे मागवली
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या डोळ्यांची साथ असून जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीवरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. डोळे आल्यानंतर उपचारासाठी डोळ्यात टाकण्यात येणारे ड्रॉप्सही जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाहीत.रत्नागिरी जिल्ह्यात हे डोळ्यांचे ड्रॉप्स उपलब्ध होत नसल्यामुळे अखेर आरोग्य विभागाने कोल्हापूरहून औषधाची मागणी केली आहे.
जिल्ह्यात सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. अशावेळी मोठ्या प्रमाणात डोळे येण्यावरीत औषधांची मागणी वाढली आहे. डोळे आल्यानंतर उपचारासाठी ड्रॉप्स टाकले जातात. या औषधांचा सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. जि.प.आरोग्य विभागाकडे डोळे येण्यावरील औषधे उपलब्ध नसल्यामुळे एकच धावपळ उडाली आहे. कोल्हापूरहून औषधांचे 300 बॉक्स मागवण्यात आले आहेत. ही औषधे आल्यानंतर त्याचे वितरण प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येणार आहे. जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले की, सध्या डोळे येण्यावरील औषधांचा तुटवडा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील औषधांच्या दुकानातही डोळे येण्यावरील ड्रॉप्स उपलब्ध होत नाहीत. अशावेळी आम्ही कोल्हापूरहून ३०० बॉक्स औषधे मागवली आहेत. ती लवकरच प्राप्त होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी मालगुड प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावण्यावरील इंजेक्शन उपलब्ध नव्हते. त्यामुळे एका रुग्णाची प्रचंड परवड झाली. त्याची रत्नागिरीपर्यंत फरफट झाली. अखेर सोमवारी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावण्यावरील 15 डोस उपलब्ध झाले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडेही कुत्रा चावल्यानंतर घ्यायच्या इंजेक्शनचा थोडाच साठा उपलब्ध आहे.