सव्वातीन कोटींचे ६ किलो सोने, ५४ लाखांची घड्याळे विमानतळावर जप्त
मुंबई: मुंबईविमानतळावर आठ स्वतंत्र घटनांत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६ किलो सोने आणि तीन ब्रँडेड घड्याळे जप्त केली आहेत. या सोन्याची किंमत ३ कोटी २० लाख रुपये आहे, तर या घड्याळांची किंमत ५४ लाख रुपये आहे. ही सर्व स्वतंत्र प्रकरणे आहेत.
या आठही प्रकरणांत भारतीय नागरिकांचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दुबई, बँकॉक, रियाध आदी देशांतून हे लोक आले होते. यापैकी केरळचा रहिवासी असलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे तीन आलिशान घड्याळे आणि १० ग्रॅम सोने आढळून आले. तर, दुसऱ्या प्रकरणातील व्यक्ती कोल्हापूर येथील असून त्याने सोन्याची पेस्ट अंतर्वस्त्रात लपवली होती. तिसऱ्या प्रकरणात दुबईतून आलेल्या तीन प्रवाशांकडे अनुक्रमे १५७० ग्रॅम, २८९ ग्रॅम आणि २३९ ग्रॅम सोने व दागिने आढळून आले. हे सोने त्यांनी आपल्या कपड्यांमध्ये लपविले होते. बँकॉक व रियाध येथून आलेल्या तीन प्रवाशांनी सोन्याची पेस्ट व दागिने हे आपल्या बुटांमध्ये लपविल्याचे आढळून आले आहे.