अजित पवार गटाकडून नऊ मंत्र्यांना अतिरिक्त जिल्ह्यांची जबाबदारी
मुंबई: एकीकडे शरद पवारांच्या राज्यभरात सभा होत आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे. अजित पवार गटाने आपल्या नऊ मंत्र्यांवर राज्यभरातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे.
यामध्ये नवे कार्यकर्ते पक्षात घेणे, विद्यमान नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करणे अशा जबाबदाऱ्या असणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, रायगड या भागांमध्ये पक्ष वाढवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कारण या सर्व जिल्ह्यांमध्ये भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटाचा चांगलाच प्रभाव आहे. अजित पवारांवर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी आहे. तर कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांना भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि नागपूरची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे छगन भुजबळ – नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर, दिलीप वळसे पाटील – अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा, हसन मुश्रीफ – कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि अहमदनगर, धनंजय मुंडे – बीड, परभणी, नांदेड, आणि जालना, संजय बनसोडे – हिंगोली,लातूर आणि उस्मानाबाद, आदिती तटकरे -रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर, अनिल पाटील – जळगाव, धुळे आणि नंदुरबार, धर्मारावबाबा आत्राम – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 जुलैला फूट पडली आणि त्यानंतर 5 जुलैला अजित पवार यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना जिथे सभा घ्याल, तिथे उत्तर देणार, वय झालं, हट्ट सोडा, अशा शब्दांत शरद पवार यांना उत्तर सभा घेण्याचा इशारा दिला. आता लवकरच अजित पवार यांची उत्तर सभा पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बीड जिल्ह्यात सभा पार पडली आणि या सभेनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील शरद पवार यांच्या आरोपांना उत्तर देणारी जाहीर सभा 27 ऑगस्टला बीडमध्ये घेणार आहेत. या सभेत शक्तीप्रदर्शन करण्याचा चंग धनंजय मुंडे यांनी बांधला आहे.
एकीकडे शरद पवारांच्या सभा होत असताना अजित पवार गटाकडून उत्तर सभा तर होणार आहेत. यासोबतच राज्यभरातील मतदार जोडण्यासाठी वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून आयोजन करण्यात येणार आहे. एकंदरीतच शरद पवार यांनी भाजप सोबत येण्यास नकार दिल्यामुळे आगामी काळात शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष मोठ्या प्रमाणात राज्याला पहायला मिळण्याची शक्यता आहे. याचीच चुणूक सध्या राज्यभरात पार पडणाऱ्या शरद पवारांच्या सभा आणि त्यानंतर अजित पवारांच्या उत्तर सभातून पाहायला मिळणार आहे.