सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : शरद पवार
पुणे, : एखाद्या चॅनलवर सत्ताधार्यांविषयी टीकेची बातमी दाखवली जात असले तर लगेच त्या चॅनल च्या प्रमुखाला कॉल केला जातो. त्यामुळे सध्या सत्ताधारी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा काम करत आहेत.सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यायचे असेल तर सोशल मीडियाची यंत्रणा तयार करणे उत्तम पर्याय आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मिडीया फ्रंट आयोजित सोशल मीडिया मार्गदर्शन शिबीर व कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते.
पवार म्हणाले, जगात काय घडतंय, देशात काय घडतंय त्याची माहिती ठेवण्यासाठी सोशल मीडिया सारखे साधन महत्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर होतोय त्याला आवर घालण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. ती सोशल मीडिया माध्यमातून दाखविणे गरजेचे आहे. आज आपल्या काही सहकार्यांनी रस्ता बदलला आणि भाजपमध्ये जाऊन बसले ते म्हणतात आमच्यावर दबाव आहे. आमचा विचार बदलला नाही पण जेल मध्ये जाऊ नये म्हणून तिकडे जावे लागत आहे. सामनाच्या संपादकांना देखील जेलमध्ये जावे लागले. अनिल देशमुख १४ महिने तुरुंगात होते. त्यांना ही सांगितले होते तुम्ही इकडे या. त्यांनी सांगितले मी कोणतीही चूक केली नाही.
पवारांनी देशात सुरु असेलेल्या धार्मिक वादाच्या मुद्द्याला हात घातला. आम्हाला देशामध्ये धार्मिक युद्दध नकोत, आम्हाला दंगली नकोत, आम्ही शांततेचे पुजारी आहोत. आम्ही लोकांच्या समतेचा आग्रह करणारे आहोत. जर सरकारी यंत्रणा असं करत असेल, ते आम्हाला मंजूर नाही. सोशल मीडियाच्या वापराबद्दल बोलताना पवार म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आटोक्यात आणता येऊ शकते. जर सोशल मीडियाच्या माध्यातून आपण त्यांच्यावर हल्ला केला तर राज्यकर्ते हे परत करण्याच्या आधी विचार करतील. तुम्ही जागरुक राहीले पाहिजे, रोज काय घडतय त्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यात जर तुमच्यातील एकावर हल्ला झाला, तर तुमच्यातल्या ५० जणांनी त्याला उत्तर दिले पाहिजे. ज्यावेळी तुम्ही अधिक संख्येने उत्तर द्याल तेव्हा, तुमच्यावर हल्ला करणारे शंभर टक्के थांबतील.
- यावेळी पवारांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टिका केली. राष्ट्रीय यंत्रणांचा ते गैरवापर करत असल्याचे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. पवार म्हणाले की, आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा पूर्ण दृष्टीकोन हा यंत्रणेचा गैरवापर करणे आणि ते उध्वस्त करणे ही भूमिका घेऊनच ते राज्य करतात. ही भूमिका तरुण पीढीच्या भल्याची नाही, राज्याच्या भल्याची नाही. हे टाळायचं असेल, त्याला आवर घालायचा असेल, तर सोशल मीडिया हा एकमेव पर्याय आहे.