ताज्या बातम्या

दख्खन पठाराची नाळ जगाशी जोडणारा हजारो वर्षापूर्वीचा सह्याद्रीतला व्यापारी मार्ग


सह्याद्रीच्या डोंगरघाटानं नटलेला भाग म्हणजे आपला महाराष्ट्र, जैवविविधता, खनिज संपत्ती अन् निसर्गाने भरभरून दिलेले दान म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा.नाणेघाट ही डोंगरवाट त्यातीलच एक. असं म्हणतात ना घाटवाट ही डोंगरवाट असते. मात्र प्रत्येक डोंगरवाट ही घाटवाट नसते. जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक हाच तो पश्चिम घाट. हाच माझा सह्याद्री.

 

इथल्या घाटवाटा जणू सह्याद्रीच्या धमन्याच. घाटवाट फक्त पाहून चालत नाही तर ही गोष्ट आहे पाहण्याची, ऐकण्याची अन् त्याहून जास्त अनुभवण्यासाठी. इतिहासाची पान चाळली तर दख्खन पठाराची नाळ जगाशी जोडणारा भव्य नानेघाट, आज पर्यटकांना भूरळ घालतो. पश्चिम घाटाचा एक भाग असलेला नाणेघाट हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. इतिहासानुसार कल्याण ते जुन्नर या व्यापारी मार्गावर नाणेघाट म्हणजे ऐतिहासिक काळातील टोल वसुली केंद्र. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार करणारा हा एक मार्ग.

 

नाणेघाटला कसं जायचं?

 

मुंबईहून नाणेघाटला जायचं असल्यास कल्याण कल्याण मुरबाड मार्गे वैशाखरे गावी यावे. आता वैशाखरे जरी पायथ्याचं गाव असलं तरी त्यापुढे २-३ किमी अंतरावरच नानेघाटचा फलक पाहायला मिळतो. इथून तुमचा ट्रेक सुरु होतो व साधारण २ तासात तुम्ही घाट माथ्यावर पोहोचता. पुण्याहून प्रवास करत असाल तर पुणे-जुन्नर-घाटघर असा प्रवास करा. घाटघरपासून ५ किमी अंतरावरून थेट नाणेघाटात पोहचाल.

 

कसा होतो प्रवास?

 

 

पहाटे ४ वाजता वैशाखरे या पायथ्याशी असलेल्या गावात आम्ही पोहचलो. मग काय फ्रेश होऊन मस्त मॅगीवर ताव मारला आणि मग आम्ही चालायला सुरुवात केली. सुरुवातीलाच एक कमान लागली. ५ मिनटे अजून चालल्यावर नानेघाटचा प्रवेशद्वार आमच्या स्वागतासाठी सज्ज होता. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि शांतता मनाला सुखावत होती. ह्या ट्रेकबद्दल अनोखी गोष्ट ती म्हणजे, आज २ जिल्ह्यांमधून मी ट्रेक करणार होतो. ५-७ मिनिटातच पाहिली पुढे आम्हाला पाण्यातून चालावे लागले. पायाचे तळवे भिजतील एवढंच काय ते पाणी होतं. हे पार पडल नाही तोच समोर धुक्यात हरवलेला नानचा अंगठा दृष्टी क्षेपात पडला.

 

गर्द झाडीतून पक्षांचे सुमधुर आवाज कानी येऊ लागले आणि खळे काकांची भैरवी आठवली “वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती”. पुढे ६५ डिग्रीचा छोटासा टेपाड लागतो. इथे मात्र थोडी दमछाक होते पण इतक्यातच समोरच दृश्य आणि हवेतला गारवा यामुळे सगळा क्षीण निघून जातो. या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथा कोरून ठेवलेली आढळते. भारतातील बहुतांशी लिपींची मातृलिपी असणाऱ्या ब्राह्मी लिपीत हा लेख कोरला आहे. डाव्या आणि उजव्या भिंतीवर प्रचंड शिलालेखात देवी नागनीका किने केलेल्या यज्ञांचे, दानाचे एकंदरीत केलेली पुण्यकृत्ये गौरवाने वर्णिली आहेत.

 

४०-४५ लोक एका वेळेस राहू शकतील एवढी मोठी गुहा याठिकाणी पाहायला मिळते. जीवधन, वानरलिंगी हे डावीकडे तर उजवीकडे वऱ्हाडाचे सुळके, भैरवगड, घनचक्करची रांग व मागे हरिश्चंद्रगड हे सर्व दिसते. इतिहासावर मनापासून प्रेम असेल किंवा त्याकाळच्या गोष्टी जाणून घ्यायची थोडी जरी ओढ मनामध्ये असेल तर हा सातवाहनकालीन व्यापारी महामार्ग डोळ्यासमोर उभा राहतो. विविध वस्तूंच्या दळणवळणाची सोय, पाणी, विश्रांतीसाठीच्या गुहा, करं गोळा करणारा मोठा दगडी रांजण खरच इतिहास प्रेमींसाठी हा ट्रेक मेजवाणीच म्हणावी लागेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button