माजी क्रिकेटपटू म्हणतोय, “आता टीम इंडियाची कॅप मिळवणं सोपे झालेय”
सध्या भारतीय क्रिकेट संघ आयर्लंड दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (18 ऑगस्ट) खेळला गेला. डब्लिन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी विजयी घोषित केले.या सामन्यात भारतासाठी युवा फलंदाज रिंकू सिंग व वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांनी टी20 पदार्पण केले. असे असतानाच भारताचे माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना वासन यांनी सध्या भारतीय संघाची कॅप मिळवणे अगदी सोपे झाल्याचे म्हटले. ते म्हणाले,
“आपल्याला दिसून येईल की सध्या भारतीय संघाची कॅप मिळवणे सोपे झालेले दिसते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तुम्हाला भारतीय संघात स्थान दिले जातेय. विविध देशातील क्रिकेटपटू टी10, टी20 व्यावसायिक लीग खेळून आपला दर्जा दाखवतात.”
भारतीय संघासाठी मागील तीन वर्षात 30 पेक्षा जास्त खेळाडूंनी पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी समाप्त झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार व तिलक वर्मा यांनी भारतीय संघाची कॅप परिधान केले होते. त्यानंतर आता रिंकू सिंग आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. याच दौऱ्यावर जितेश शर्मा हार्दिक पदार्पण करण्याची शक्यता आहे. यानंतर चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारताचे असेच युवा खेळाडू दिसून येतील.
आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली असून, जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. तर एशियन गेम्समध्ये नेतृत्वाची धुरा दिलेला ऋतुराज गायकवाड या संघाचे उपकर्णधारपद सांभाळतोय.